Jyoti Waghmare : ठाण्यातील शाखेवरून शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने आल्याने वाद चांगलाच चिघळला आहे. शाखा पडलेल्या ठिकाणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी भेट देण्यासाठी गेल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावरून दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हिंदू धर्मीयांचे सण उत्सव जवळ आलेले असताना त्यांना असले उद्योग सूचतात का? दिवाळी चांगल्या पद्धतीने होऊ नये, असे उद्धव ठाकरे यांना वाटत आहे का ? असा सवाल करीत शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी धारेवर धरले.
मुंब्रा येथील शाखा ही आनंद दिघे साहेबांनी घेतली, मात्र तिथं बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्यासाठी शाखा भाड्याने दिली होती, शाखा भाड्याने देणे म्हणजे आईच दूध विकण्यासारखा प्रकार आहे, असा आरोपही प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः चे बॅनर्स त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फाडलेत का ? हे आम्हाला तपासावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.
मुंब्रा, कळवा परिसरात ड्रग्सचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त होणार आहे. त्या भागातील एका मोठ्या नेत्याला कोविड झालेला होता आणि त्याच्या रिपोर्ट्समध्ये ड्रग्सही आढळून आले आहे, वेळ आल्यानंतर त्याच नाव जाहीर करणार आहे. येत्या काळात संजय राऊत यांनी एक पिंजरा आणि पोपट घेऊन रस्त्याच्या कडेला बसून भविष्य सांगावे. त्यांच्यात खुमखुमी असेल तर त्यांनी जनतेमधून निवडून यावे, असेही या वेळी बोलताना प्रा. डॉ. वाघमारे म्हणाल्या.
...तर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीत
स्वतःचे पंख कापून घेऊन दुसऱ्याच्या कुबड्यावर चालायला लागलं की अशी वेळ येते, असा टोला या वेळी बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. मुंब्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड स्वागताला जाणार असतील तर सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीत असे चित्र दिसत आहे, असेही या वेळी बोलताना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.