Sangli Political News : काँग्रेसने कधीही कुणाला पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही, तर भाजप आणि आरएसएसनेच राहुल गांधींना 2014 पासून पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केली. पंतप्रधान मोदी, विश्वजित कदमांना हॅप्पी बड्डेच्या शुभेच्छा देण्यासाठी ईडी पाठवतील, असा खोचक टोलाही कन्हैया यांनी लगावला.
देशभरात भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या धोरणावर सडकून टीका करणारे अशी कन्हैयाकुमारांची ओळख आहे. ते पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजित कदमांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव येथे आले होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री दिनेश गुंडू राव, राज्यसभा सदस्य मोहम्मद इम्रान प्रतापगडी, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कन्हैयाकुमार (KanhaiyaKumar) म्हणाले, 'भारत जगातील सर्वात विकसित देश बनत असल्याचे सरकार सांगत आहे. तेव्हा 80 कोटी लोक कोण आहेत, जे रेशनिंगचे अन्नधान्य घेण्यासाठी लाईनमध्ये उभे असतात. आज सामान्य लोकांवर अत्याचार होतात. त्यांना प्रश्न विचारताच, ते लोक तुम्हाला राजकारण करीत असल्याचे म्हणतील. एका वर्षात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमदार, खासदार आणि प्रधानमंत्री पाच वर्षांसाठी असतात. गरीब आणि शेतकऱ्यांचा मुलगा आर्मीत अग्निवीर नावाने नोकरी करणार चार वर्षांसाठी, ही तरुणांची फसवणूक आहे,' असा आरोपही त्यांनी केला.
मणिपूर येथे महिला, तरुण आणि सामान्य लोकांवर मोठा अन्याय झाला आहे. परंतु, पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींनी मणिपूरचे नावही घेतले नाही. केवळ एकदाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी मणिपूरचे नाव घेतले. देशात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात न्याय यात्रा सुरू होत असल्याची माहितीही कुमारांनी दिली आहे.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा धागा पकडून कन्हैयाकुमार म्हणाले, विश्वजितभय्या (Vishwajeet Kadam) आपको प्रधानमंत्रीने हॅप्पी बड्डे बोले क्या?' यावर विश्वजित कदमांनी शुभेच्छा नाही आल्या असे सांगितले. त्यानंतर कन्हैयाकुमार म्हणाले, तुम्हाला हॅप्पी बड्डे बोलण्यासाठी पंतप्रधान मोदी ईडी पाठवतील,' असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, 'देशात महिलांची नग्न करून धिंड काढली होती. तरुणांना जबरदस्त मारहाण केली जात आहे. परंतु, याकडे पाहायला जय शाहच्या पप्पांना वेळ मिळाला नाही,' असा घाणाघातही कुमारांनी केला.
(Edited by Sunil Dhumal)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.