Kolhapur Politics : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या लगबगीने सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारी करताना दिसत आहेत. सत्तेतील पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील मातब्बर चेहऱ्यांना भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. सर्वच हालचाल गतिमान झाल्या असताना काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटलांनी मात्र या प्रश्नावर बोलायला नकार दिला आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक पक्षांतर करणार असल्याच्या प्रश्नावरून बोलताना सतेज पाटील यांनी थेट, मला हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही, असे उत्तर दिले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असून इंडिया आघाडी करण्यामागे त्यांचा प्रमुख वाटा आहे. एक भूमिका घेऊन इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येतील, यात तथ्य नाही. राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे आम्ही एकत्र काम करू, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर बोलताना पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे बोट दाखविले. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तो ओबीसी संदर्भात झाला आहे. आहे ती परिस्थिती ठेवा निवडणूक घ्या, अशा सूचना राज्य सरकारला कोर्टाला दिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका होणारच आहे.
एकाच वेळी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका घेता येईल का? याची साशंकता आहे. सर्व पक्षाने एकत्र येऊन चर्चा करावी, त्यासंदर्भातील राज्य सरकारने बैठक घ्यावी. निवडणुका कशा घ्याव्यात, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, अशी विनंतीही सतेज पाटील यांनी राज्य शासनाला केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.