

Kolhapur DCC Bank: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून माजी आमदार संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिले होते. मात्र ते कर्ज प्रकरण आता जिल्हा बँकेलाच महागात पडले आहे. खाजगी प्रकल्पास केडीसी बँकेने केलेल्या कर्जपुरवठा प्रकरणी रिझर्व बँकेकडून केडीसी बँकेला दणका मिळाला आहे. तब्बल सव्वा तेरा लाख रुपयाचा दंड केडीसी बँकेला केला आहे. त्यामुळे माजी आमदार संजय घाटगे यांना केलेली मदत ही केडीसी बँकेला भुर्दंड म्हणून सहन करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघातील अडचण दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेकडून माजी आमदार आणि भाजपचे नेते संजय घाडगे यांच्या अन्नपूर्णा शुगर अँड जेरी प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी प्रकल्पाला कर्ज मंजूर केले होते. यातून राजकीय संबंध राखण्यासाठी झालेला खर्च पुरवठा करण्याचा निर्णयाने आता केडीसी बँकेलाच गोत्यात आणले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या सेक्शन २० (१) आणि सेक्शन ५६ संदर्भातील तरतुदींची पूर्तता न केल्याने ही कारवाई केली आहे. नाबार्डकडून ३१ मार्च २०२५ च्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी काही नियमांची पूर्तता न केल्याचे निदर्शनास आले होते. चीफ जनरल मॅनेजर ब्रिज राज यांनी ही कारवाई केली आहे.
केडीसी बँकेने अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिले होते. त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष संजय घाटगे हे होते. २०२३ मध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून घाटगे यांची नियुक्ती झाली. नियमानुसार बँकेच्या संचालकांना खाजगी कंपनीला कर्ज देता येत नाही. मात्र नाबार्डच्या चौकशीत ही बाब उघड झाली. नियमांचे पालन न झाल्यामुळे कोल्हापूर मध्यवर्ती जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अखेर रिझर्व बँकेकडून दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रक्कम रिझर्व बँकेला परत न केल्याबद्दल दंड केल्याचे ब्रिज राज यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
काय आहेत राजकीय समीकरणं?
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत पाहायला मिळत होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे अशी लढत झाली आहे. तिरंगी लढतीमुळे त्याचा फायदा मुश्रीफ यांनाच झाला होता. मात्र या निवडणुकीची परिस्थिती वेगळी असल्याने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून यंदा माजी आमदार संजय घाटगे आणि मंत्री मुश्रीफ यांचा समेट घडला. निवडणुकीच्या तोंडावर घाटगे यांच्या अन्नपूर्णा कंपनीला जिल्हा बँकेतून कर्ज देण्यात आले. शिवाय जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून ही नियुक्ती देण्यात आली. याचा परिणाम यंदाची विधानसभा निवडणूक ही दुरंगी झाली. संजय घाटगे यांनी मुश्रीफांना पाठिंबा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.