Gokul Election: कोल्हापूरमध्ये सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. ही लढत निश्चित असतानाच चंदगडमध्ये दोनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी एकत्र येत धक्कातंक्ष अवलंबले आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांप्रमाणे दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा डॉ. नंदा बाभुळकर यांनी केली. तर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन गोकुळ दूध संघाची निवडणूक सोबत लढण्याचा शब्द दिला असल्याचे सांगण्यात येते.
''आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित सामोरे जातील, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची गोकुळबाबत आज वेगळी भूमिका असली, तरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे असल्याने त्यांनी शब्द टाकल्यानंतर ते महायुती सोडून कोठेही जाणार नाहीत" असे डॉ. नंदा बाभुळकर म्हणाल्या.
काही दिवसापूर्वी संग्रामसिंह कुपेकर यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची कोल्हापुरातील कार्यालयात भेट घेतली होती. तर रामराजे कुपेकर हे देखील सतेज पाटील यांच्या संपर्कात आहेत. कुपेकर बंधू गोकुळ दूध संघाची निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्यासोबत लढवण्याची शक्यता असल्याने डॉ. नंदा बाबुळकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
''गडहिंग्लज उपविभागात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजकारणात काय घडते, हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने या दोन्ही स्थानिक संस्थांत आम्ही सत्तेवर आहे. त्यामुळे गोकुळ, केडीसीसी या सहकारातील संस्थांसह आगामी ग्रामपंचायत निवडणुकांतही मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे राहू.'' असा विश्वास डॉ. बाबुळकर यांनी व्यक्त केला.
डॉ. बाभूळकर पुढे म्हणाल्या, ''कार्यकर्त्यांनी पक्षाचा हक्काचा माणूस गोकुळमध्ये असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या गटाला उमेदवारी, स्वीकृत संचालकपद मिळावे, यासाठी मुश्रीफ यांच्यासमोर चर्चा करणार आहे. कार्यकर्त्यांकडे प्रत्येक गावात एखादी तरी दूध संस्था आहे. योग्य माणसाच्या नावे ठराव द्या, आमिषाला बळी पडू नका. आपल्या गटाचे सर्व ठराव एकत्रित करून मुश्रीफ यांची भेट घेऊ व कार्यकर्त्यांच्या भावना मांडू.''
आता दोनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या एकत्र लढण्याच्या निर्णयावर महायुती व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.