Gokul Election : नेत्यांच्या हवेत बाता, ठरावांचा आकडा फुगवून बांधले बडे इमले; आता 15 जुलैनंतर पितळ उघडं पडणार

Gokul Milk Election Resolution Data Exposes : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांचे दावे फोल ठरले असून नेत्यांच्या भाषणातील ठरावांचे मोठे दावे आणि प्रत्यक्षात समोर आलेली आकडेवारीमुळे आता खळबळ उडाली आहे.
BJP changes equation in Gokul election
GokulSarkarnama
Published on
Updated on

Gokul Election News : गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने ठराव दाखल केल्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. केवळ शक्तिप्रदर्शन करूनच सर्वपक्षीय नेत्यांनी हवेत बाता मारल्याचा प्रकार आता समोर आला आहे. नेत्यांनी दावा केलेले ठराव आणि प्रत्यक्ष दाखल केलेले ठराव यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. केवळ भाषणामध्येच मोठे मोठे इमले बांधून दूध उत्पादक आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण संस्था सभासददेखील तितकेच चतुर निघाले असून, कोणत्याही नेत्याला नाराज न करण्याचे धोरण स्वीकारत जवळपास 56 ठराव दुबार दाखल झाले आहेत. त्यामुळे येत्या 15 जुलैनंतर नेत्यांच्या दाव्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेचा आज अंतिम दिवस होता. गोकुळकडून मतदानासाठी पात्र करण्यात आलेल्या संस्थांची संख्या 5427 इतकी आहे. तर दुग्ध निबंधक कार्यालयाकडून मतदानासाठी पात्र करण्यात आलेल्या संस्थांची संख्या 4844 इतकी आहे.

त्यामध्ये अवसायनातील व मध्यंतरीच्या आदेशातील संस्था अपात्र होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. मात्र सर्वपक्षीय नेत्यांकडून दावा करण्यात आलेल्या ठरावांची संख्या ही गोकुळ दूध संघाने मान्य केलेल्या संस्थांपेक्षा अधिक आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडे 7610 इतके ठराव असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ठरावांचा आकडा नेमका फुगवला कुणी? मूळ संस्था सभासदांच्या यादीत अपात्र संस्था घुसडल्या कुणी? शिवाय ठरावांच्या संख्येनुसार कुणाला किती जागा मिळणार? या सर्व गोष्टींचे पितळ येत्या 15 जुलैनंतर उघड पडणार आहे.

BJP changes equation in Gokul election
Gokul Election : ए वाय पाटलांचा मास्टरस्ट्रोक, मेळाव्यातून दाखवला दम : फलकावर सतेज पाटलांचा फोटो गायब, मुश्रीफांनाही वगळलं

कुणी किती आकडा फुगवला?

सर्वपक्षीय नेत्यांनी मोठा गाजावाजा करत आणि शक्तिप्रदर्शन करत ठरावांचा आकडा फुगवलेला दिसतो. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 25 जून रोजी शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठराव दाखल केले. त्यांनी जवळपास 1971 ठराव दाखल करण्याची घोषणा केली. तसेच आणखी ठराव दाखल होण्याचा दावा केला. मात्र त्या दिवशी एकूण 1658 ठराव दाखल झाले. भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्तीकडून 25 जून रोजी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपकडून 1431, शिवसेनेकडून 1514 तर जनसुराज्यकडून 547 ठराव असल्याचा दावा करण्यात आला.

मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी 2289 ठराव दाखल झाले. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी 30 जून रोजी शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसकडे 1851 ठराव असल्याचा दावा केला. मात्र त्या दिवशी 663 ठराव दाखल झाले. दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांकडे न जाता अनेकांनी व्यक्तिगत ठराव दाखल केले आहेत. शिवाय गर्दी होऊ नये, यासाठी यापूर्वीच अनेकांनी ठराव दाखल केले आहेत. पण पूर्वी दाखल केलेले ठराव आणि नेत्यांनी केलेल्या दाव्यामध्ये पुन्हा तफावत आढळते.

प्रत्यक्षात किती ठराव दाखल?

प्रत्यक्षात दाखल झालेल्या ठरावांची आकडेवारी आता समोर आली आहे. प्रत्यक्षात 5439 ठराव दाखल झाले आहेत. यामध्ये दुबार ठराव 56 इतके आहेत. करवीर 867, भुदरगड 595, राधानगरी 703, कागल 621, पन्हाळा 515, गगनबावडा 132, शाहूवाडी 445, शिरोळ 270, चंदगड 424, आजरा 305, गडहिंग्लज 401, हातकणंगले 161 असे तालुकानिहाय ठराव जमा झाले आहेत.

ठरावावर जागांचे गणित

दरम्यान, महायुतीतील नेत्यांकडून ज्याचे ठराव अधिक, त्यानुसार जागावाटप होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांनीच सभासदांची दिशाभूल करून ठरावांचा फुगवटा दाखवून दिला आहे. मात्र प्रत्यक्ष 15 जुलैनंतर प्रारूप यादी बनवण्यासाठी या ठरावांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप यादी आणि मग अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. हेच ठराव अंतिम राहतील. त्यानुसारच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित ठरणार आहे.

अनेक संस्था होणार अपात्र

दरम्यान, गोकुळकडून देण्यात आलेल्या 5427 दूध संस्थांपैकी 664 दूध संस्था यापूर्वीच अपात्र झाल्या आहेत. विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांनी आणखी 410 संस्था अपात्र करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून, यामधून किती संस्था अपात्र होणार, त्यांचे ठराव या यादीतून बाजूला केले जाणार आहेत.

संस्था सभासदांचे दोन्ही दगडांवर हात

दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांचा फुगलेला आकडा पाहता, यामधील अनेक संस्थांनी दोन्ही दगडांवर हात ठेवले आहेत. कोणताच नेता नाराज होऊ नये, यासाठी दुबार ठराव दाखल करण्यात आले असून, त्यांची संख्या एकूण 56 इतकी आहे.

ठराव मसुदा झेरॉक्स मारून दबाव वाढवण्याचा प्रयत्न

ज्या संस्था मतदानास पात्र आहेत, त्यांनाच विभागीय दुग्ध निबंधक, कोल्हापूर यांच्याकडून ठरावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. मात्र ज्या संस्थेला मसुदा गेलेला नाही, अशांनी कार्यकर्त्यांच्या मार्फत ठरावाचा मसुदा घेऊन त्याच्या रंगीत झेरॉक्स प्रती काढून ठराव दाखल केल्याचा प्रकारही घडला आहे.

BJP changes equation in Gokul election
Gokul Milk Election: गोकुळच्या राजकारणात खळबळ! ऐन निवडणुकीत 427 दूध संस्थांवर कारवाई; सर्वपक्षीय नेत्यांना धक्का

छाननीनंतर खरा आकडा समोर

ठराव दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 5439 संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. यामध्ये पात्र आणि अपात्र संस्थांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतरच ठरावांचा खरा आकडा समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com