Kolhapur News, 28 Nov : राज्याच्या राजकारणात कोल्हापुरातील जनसुराज्य शक्तीने आपली जागा सेफ केली आहे. विधानसभा निवडणुकीत पाच ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाले.
त्यामुळे महायुतीतील राजकारणात जनसुराज्य शक्तीचे महत्त्व तितकेच आहे. हे महत्त्व नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील ठळकपणे दिसत आहे. कोल्हापूरच्या उत्तर आणि पूर्व भागात जनसुराज्य शक्तीची दखल महायुतीला घ्यावी लागेल. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत तब्बल चार ठिकाणी जनसुराज्य पक्ष हा नगराध्यक्षपदाचा दावेदार असणार आहे.
विधानसभेच्या १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या आमदार डॉ. विनय कोरे यांनी २००४ च्या दरम्यान जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. त्याचवर्षी झालेल्या विधानसभेत त्यांच्यासह चार आमदार विधानसभेत होते. त्यापैकी दोन आमदार कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आले.
त्यानंतर कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेबरोबरच गडहिंग्लज, हातकणंगले विधानसभेतही पक्षाचे उमेदवार रिंगणात राहिले होते. पण खरा प्रभाव हा महापालिका आणि जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला. महापालिका व जिल्हा परिषदेत या पक्षाने तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत राहून सत्तेत वाटा मिळवला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोरे यांच्यासह हातकणंगलेतून अशोकराव माने आमदार झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायत पैकी ४ नगरपालिकेत जनसुराजाने स्वतःच्या चिन्हावर चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलेत. पेठवडगावमध्ये सालपे गटाच्या युवक क्रांतीने 'जनसुराज्य'च्या चिन्हावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी व जनसुराज्य यांची युती आहे. या ठिकाणी प्रविता सालपे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, तर १२ उमेदवार हे पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत.
पन्हाळ्यात स्थानिक मोकाशी गटाशी आघाडी करून सात नगरसेवक यापूर्वीच बिनविरोध झाले, आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार 'जनसुराज्य'चा आहे. मलकापूर नगरपालिकेत नगरसेवकपदाचे १२, तर एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 'जनसुराज्य'चा आहे. त्याठिकाणी त्यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाशी आहे.
गडहिंग्लजमध्येही भाजप, जनता दल, शिवसेना शिंदे पक्षाच्या आघाडीत 'जनसुराज्य' सहभागी आहे. या नगरपालिकेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार 'जनसुराज्य'चा, तर सहा नगरसेवकपदाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. अन्य नगरपालिकेत या पक्षाने उमेदवारही दिले नाहीत आणि त्या ठिकाणी या पक्षाचा प्रभावही फारसा नाही.
शिरोळमध्ये 'जनसुराज्य'चा सवतासुभा, विचित्र आघाडी शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत 'जनसुराज्य'चे आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका अरविंद माने नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. तर त्यांचे पुत्र व पुतण्याची पत्नी नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे; पण त्यांनी 'जनसुराज्य' ऐवजी स्थानिक ताराराणी आघाडीची उमेदवारी स्वीकारली आहे.
हातकणंगलेचे आमदार पक्षाचे आहेत म्हणून पेठवडगावमध्ये भाजपसोबत न जाता स्वतःच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह धरणाऱ्या या पक्षाच्या आमदारांच्या स्नुषा व पुत्र मात्र दुसऱ्याच आघाडीच्या चिन्हावर रिंगणात आहेत. हा विरोधाभास चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.