Kolhapur Politics: विधानसभेच्या इच्छुकांचे महायुतीला टेन्शन; 4 जूनलाच कळणार कोणी कोणाचा केला गेम

Kolhapur Lok Sabha Constituency 2024: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात जवळपास 17 उमेदवार होते. मात्र महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत झाली.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) पार पडले. तिसऱ्या टप्यात झालेल्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 71 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या महिनाभरात आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराने कोल्हापुरात कोणत्या विचारांचा खासदार टिकणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला समतेची शिकवण देणाऱ्या कोल्हापुरात अलीकडच्या काळात धार्मिकतेचा मुद्दा बनवण्यात आला. त्यातूनच पुरोगामी विचाराचे कोल्हापूर ही ओळख पुसण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक मुद्द्यावर रान उठवले. त्यातून लोकसभेची निवडणूक लागण्यानंतर राजर्षी शाहूमहाराज यांचे वारसदार शाहू छत्रपती यांना निवडणुकीत उतरवण्यात आले.

तर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरची लढत वैचारिक मुद्द्यावर लढली गेली. त्याला काही गोष्टीत अपवाद होता. मात्र या लढतीत कोण नेम साधणार हे 4 जूनला स्पष्ट होईल. पण त्याअर्थी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात झालेली मतदानाची टक्केवारी ही नक्कीच दोन्ही उमेदवारांच्या काळजात धडकी बनवणारी आहे.

Kolhapur Politics
Akash Anand: मायावतींनी अपरिपक्व भाच्याला पदावरून हटवलं; पाच महिन्यापूर्वी केलं होतं उत्तराधिकारी

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात जवळपास 17 उमेदवार होते. मात्र महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का पाहता करवीर विधानसभा क्षेत्र सगळ्यात जास्त आघाडीवर आहे. या क्षेत्रात 79 टक्के मतदान झाले आहे. महाविकासकडून करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार पी. एन. पाटील (MLA P. N. Patil), डॉ. चेतन नरके यांची शाहू छत्रपती यांना तर महायुतीकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांची साथ खासदार संजय मंडलिक यांच्या पाठीमागे राहिले.

राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे आज करवीर मधला बराचसा भाग हरितक्रांतीने उजळून निघाला आहे. शिवाय राज्यातील काही राजकीय घटनांमुळे नाराज असलेला मतदार शाहू छत्रपती यांच्या मागे आहे. या मतदारसंघात वाढलेली टक्केवारी ही खासदार मंडलिक यांची डोकेदुखी ठरू शकते. बराचसा भाग ग्रामीण असल्याने या विधानसभा क्षेत्रात घराघरात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 25 वर्षांनी लोकसभा उमेदवार मिळाल्याने काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीत ॲक्टिव्ह पाहायला मिळाला. तर महायुतीकडून नरके यांनी ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांपासून तयार केलेली यंत्रणा ही मंडलिक यांच्या पाठीशी राहिली. पण अंडरकरंट आणि करवीरची जनता पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहण्याचा अंदाज देते.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपने स्वतंत्र या ठिकाणी उमेदवार दिला होता. त्यावेळी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती. पण त्यावेळी भाजपने वयक्तिक घेतलेली अष्टयात्तर हजार मतं ही या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरतील. असा राजकीय अंदाज बांधला जातोय. मात्र शहरातील पेठापेठाणी दिलेली शाहू महाराज छत्रपती यांना ताकद या विधानसभा क्षेत्रात निर्णय ठरू शकते. या क्षेत्रात 65 टक्के मतदान झाले आहे.

काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि त्यांच्याकडे असणारी माजी आमदार यांची फौज ग्राउंड लेव्हलपर्यंत ऍक्टिव्ह असल्याने या क्षेत्रात शाहू महाराज छत्रपती हे अत्यल्प मताधिक्याने आघाडीवर राहतील असाही अंदाज आहे. पण अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुरु केलेली मोहीम यशस्वी होऊ शकते, असंही अंदाज आहे.

राधानगरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक वास्तव्य छत्रपती घराण्याचे राहिले आहे. राधानगरीची जनता आज ही छत्रपती घराण्याच्या मागे आहे. पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यात अनेक विकास कामे झाली आहेत. त्याच्या जोरावर मंडलिक यांनी या मतदारसंघावर पकड बनवण्याचा प्रयत्न केला होता.

या क्षेत्रात काल 67 टक्के इतके मतदान झाले. पण राधानगरी सोडल्यास भुदरगड,आजरा हा मंडलिक यांच्या पारड्यात जाईल असे सांगण्यात येते. तर राधानगरीची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे उभे राहील असा अंदाज ही व्यक्त केला जातोय. शिवाय माजी आमदार के पी पाटील हे महायुतीत असले तरी आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बेरजेत त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत काय भूमिका घेतली? हे येत्या 4 जूनलाच कळेल.

कोल्हापूर दक्षिणमध्ये या लोकसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान झाले. याच मतदार संघात मागील लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने मताधिक्य मिळाले होते. मात्र यंदा सतेज पाटील हे शाहू महाराज यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. तर माजी आमदार अमल महाडीक आणि धनंजय महाडिक यांची भूमिका मंडलिक यांच्यासोबत आहे. मागील मताधिक्य यंदा मंडलिक यांना मिळणे शक्य नाही. पण पंतप्रधान मोदी आणि हिंदुत्ववादाची वाढलेली शक्ती या मतदार संघात अंशता प्रभावी ठरू शकते.

Kolhapur Politics
Dr. Subhash Bhamre: डॉ. भामरे प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती प्रबळ आहे. या मतदारसंघात 74 टक्के मतदान यावेळी झाला आहे. महाविकास आघाडीकडे केवळ माजी आमदार संजय घाटगे सोडल्यास प्रबळ नेता नाही. पण महायुतीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार मंडलिक यांचे होमपीच आणि भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समर्जित सिंह घाटगे या मतदारसंघ क्षेत्रात प्रभावी आहेत. जवळपास 75 ते 80 टक्के जनता मंडलिक यांच्या सोबत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अंडर करंट आणि पुढील विधानसभा निवडणुकीची जुळणी पहाता कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दोन दिवसात घेतलेली सभा आणि समरजीत घाटगे यांची केलेली मनधरणी कितपत प्रभावी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कागल पाठोपाठ चंदगड विधानसभा मतदारसंघात ही महायुती प्रबळ आहे. या विधानसभा क्षेत्रात 68 टक्के इतके मतदान झाले आहे. वास्तविक या क्षेत्रात यंदा कमी मतदान झाले असले तरी त्याचा प्रभाव महाविकास का महायुतीकडे असेल हे निश्चित नाही. पण विद्यमान आमदार राजेश पाटील हे खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत.

शिवाय महायुतीकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सराटी, भाजपचे प्रदेश सचिव शिवाजीराव पाटील यांचा पाठिंबा आहे. पण आगामी लोकसभा निवडणुकीची राजकीय बेरीज डोळ्यासमोर ठेवून काय फासे टाकलेत. हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबंध असल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली असेल तर कागल आणि चंदगडमधून प्रचंड मताधिक्य मंडलिक मिळवतील, असा अंदाज आहे.

करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात मतदानाची वाढलेली टक्केवारी लक्षात घेता या चारही विधानसभा क्षेत्रातून बदल घडवण्यासाठी प्रतिसाद मिळाला असल्याची संकेत आहेत. मात्र चंदगड आणि कागल तालुक्यातील महायुतीच्या नेत्यानी उभी केलेली यंत्रणा आणि केलेल्या जोडण्यावर खासदार मंडलिक यांची मदार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com