

kolhapur News: महापौर आणि उपमहापौर निवड झाल्यानंतर इच्छुकांनी आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. पडद्यामागून जोडण्या लावणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते आणि पक्ष आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतलेल्या इच्छुकांची धडपड या निमित्ताने सुरू आहे.
महानगरपालिकेतील आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड २० फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या असून सर्वच पक्षांमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यास नगरविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आठ नगरसेवकांची निवड होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित करताना विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वीकृत करून घेतो असे शब्द दिले आहेत. त्यामुळे स्वीकृतसाठी मोठी चढाओढ होणार आहे. शिवाय नेत्यांची डोकेदुखी वाढणार असून मोठी कसरत करावी लागणार आहे.
यापूर्वीच्या महापालिका सभागृहात सदस्य संख्या ८१ असूनही स्वीकृत नगरसेवकांची संख्या मात्र पाच होती. ती यावेळी वाढवून आठ इतकी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक असल्याने त्यांना तीन स्वीकृत नगरसेवक, भाजपचे २६ नगरसेवक असल्याने त्यांना तीन तर शिंदेसेनेचे १५ नगरसेवक असल्याने त्यांना दोन स्वीकृत नगरसेवक करून घेता येणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, उद्धवसेनेला त्यामध्ये स्थान मिळणार नाही. ही नावे गटनेत्यांनी महापौरांना द्यावी लागतील.
कोल्हापूर महानगरपालिका सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे असल्याने काँग्रेसला तीन स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. त्याबाबत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील निर्णय घेणार आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने, सुनील मोदी यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. तर अन्य एकजण सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांनी शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला.
या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात होती. शिवाय राहुल माने यांच्याकडे कामाचा अनुभव असल्याने त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून सुनील मोदी स्वीकृत नगरसेवक पदावर निवड केली जाण्याची शक्यता आहे. जागा वाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून कमी जागा मिळाल्या असल्या तरी स्वीकृत नगरसेवक पदाची आठ काँग्रेससमोर ठेवली होती. नुकताच सुनील मोदी यांनी निवडणूक झाल्यानंतर ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातून त्यांना स्वीकृत नगरसेवक मिळेल का? शिवाय सतेज पाटील हे कोणत्या कार्यकर्त्याला संधी देणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेस बरोबर भाजपला देखील तीन स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. यामध्ये प्रा. जयंत पाटील, विजय सूर्यवंशी, चंद्रकांत घाटगे यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपमध्ये जागा वाटपापासून ते उमेदवार निवडी पर्यंत सर्व कामकाज हे प्राध्यापक जयंत पाटील यांनी पाहिले होते. मागील सभागृहात ते देखील भाजपकडून स्वीकृत नगरसेवक होते. यावेळी देखील त्यांच्या नावाची निवड होऊ शकते. दुसरीकडे भाजपचे निष्ठावंत मानले जाणारे विजय सूर्यवंशी हे देखील रेसमध्ये आहेत. त्याचबरोबर, प्रसाद जाधव, विलास चिखलीकर, चंद्रकांत घाटगे यांचे नाव तिसऱ्या पदासाठी पुढे येऊ शकते.
शिंदेंच्या शिवसेनेकडून या पदासाठी दोघा स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे त्यामध्ये शिवसेनेचे शहर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक दहा मधून प्रसाद चव्हाण यांनी पक्ष आदेश मानून निवडणुकीतून अर्ज माघार घेतली त्यावेळी स्वीकृत पदावर निवड केली जाण्याची अट चव्हाण यांनी शिवसेने समोर ठेवली होती. तर दुसरे पद हे इंद्रजित आडगुले याचे नाव चर्चेत आहे. पण ऐनवेळी शिवसेनेकडून आणखी एक नाव समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.