

Kolhapur News, 14 Nov : आगामी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात सर्वात प्रथम चंदगड तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होऊन आगामी नगरपालिकेची निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय झाला. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेनेला गृहीत न धरता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी गाठ बांधली.
त्यावरून भाजप नेते आणि आमदार शिवाजीराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आता या दोन्ही राष्ट्रवादीच्या मदतीसाठी काँग्रेसने हात पुढे केला आहे. यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची गट्टी कायम असल्याचं सांगितले जात आहे.
चंदगड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आघाडी जाहीर झाली. त्यापाठोपाठ याआघाडीत आता काँग्रेसही सहभागी झाली आहे. आज येथे माजी आमदार राजेश पाटील, काँग्रेसचे गोपाळराव पाटील, एम.जे. पाटील आदींनी एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
माजी आमदार पाटील म्हणाले, 'दोन दिवसांपूर्वीच समविचारी म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारणा केली होती. मात्र, वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याची घोषणा करत होते. शिवाय वारंवार सतेज पाटील यांचा देखील चिमटा काढत होते. त्यांच्यावर टीकाटिप्पणी करून आपण महायुतीसोबत एकनिष्ठ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र चंदगडमधील आघाडीने पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. जर दोन्ही राष्ट्रवादीशी मिळवून घ्यायचा आहे तर कागलमध्ये कोणती अडचण आहे? अशी विचारणा आता कार्यकर्त्यांकडून देखील होत आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळाल्याने पक्षाचे गोपाळराव पाटील, विक्रमसिंह चव्हाण-पाटील, तात्यासाहेब देसाई यांनी आपण पक्ष म्हणून आघाडीत सहभागी होत असल्याचे सांगितले.
दोन राष्ट्रवादीसह काँग्रेसची साथ मिळाल्याने आमची आघाडी भरभक्कम झाली आहे. विरोधी आघाडीशी ती ताकदीने लढत देईल. अशाच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीही आघाडी कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.' गोपाळराव पाटील म्हणाले, 'काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वीपासून युती धर्म आहे. त्यांची विचारधारा पुरोगामी आहे. त्याच मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत.
जागावाटप झाल्या असून, लवकरच उमेदवार निश्चित केले जातील.' विक्रमसिंह चव्हाण-पाटील म्हणाले, 'काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या आघाडीला तातडीने होकार दर्शवला.
राजर्षी शाहू आघाडी या नावाने तयार झालेली ही आघाडी निश्चितपणे विरोधी आघाडीला शह देईल.' या वेळी दयानंद काणेकर, प्रवीण वाटंगी, राजेंद्र परीट, भैरू खांडेकर, सागर पाटील, भिकू गावडे, अभय देसाई, सदानंद आवटे, बाळासाहेब घोडके, अली मुल्ला आदी उपस्थित होते. संजय चंदगडकर यांनी स्वागत केले. शिवानंद हुंबरवाडी यांनी आभार मानले.
गतवेळेप्रमाणेच आघाडींची रचना नगरपंचायतीच्या गतवेळच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. राज्याच्या राजकारणातील घडामोडींचा इथल्या राजकारणावरही परिणाम झाला. गटांमध्ये विभागणी झाली. विरोधी वातावरण तयार झाले. मात्र, पुरोगामी विचारधारेच्या मुद्यावर ते सर्वजण पुन्हा एकत्र आल्याने गतवेळचेच चित्र तयार झाले आहे. यावेळीही ही आघाडी बाजी मारणार का, याकडे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.