
Kolhapur, 21 Apr 2025: कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वैद्यकीय खात्याची जबाबदारी दोन मंत्र्यांवर आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आहेत. दोन्ही मंत्री वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र उपचाराविना एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयापर्यंत येण्यासाठी रस्ता नसल्याने, आणि वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेला खांद्यावरून घेऊन येण्याची वेळ नातेवाईकांवर आली. रुग्णालयात आणण्यासाठी उशीर झाल्याने वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे दगडूबाई राजाराम देवणे (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याअभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार, असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.
स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरीही कोल्हापूर शहराच्या आसपास असणाऱ्या वीस ते तीस किलोमीटर परिसरातील धनगर वाड्यातील परिस्थिती 'जैसे थे' आहे. दळणवळणाच्या सुविधा नाहीत, वस्ती वाड्यावर रस्ते नाहीत. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या जीवाशी खेळावे लागत आहे. करवीर तालुक्यातील उपवडेपैकी बेंडाई धनगर वाडा येथे शंभर दीडशे लोकसंख्या असलेला धनगरवाडा आहे. ही घटना येथेच घडली आहे. धनगर वाड्यावरील घरे पन्हाळा तालुक्यातील गावात असल्याने करवीर पन्हाळा तालुक्याच्या हद्दीत विकासापासून हे धनगरवाडे वंचित आहेत.
दगडूबाई देवणे या दैनंदिन कामासाठी शेतात गेल्या होत्या. भर दुपारी उन्हात शेतात काम करत असताना चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. रुग्णालयात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना खाटेवर ठेवून खांद्यावरून त्यांना पाचकटेवाडी येथे आणले.
रस्ता खचल्यामुळे डोंगरातून उतरताना त्यांना आणण्यात अडचणी येत होत्या. यातच वेळ गेला. दवाखान्यात पोहोचण्यास सायंकाळ झाली. दोनवडे येथे त्यांना खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
रस्त्याअभावी आणखी किती लोकांचा मृत्यू होणार, असा प्रश्न आहे. रस्ता नसल्यामुळे गर्भवतींनाही डाल्यात किंवा खाटल्यावरून वस्तीखालील पाचकटेवाडी येथे आणावे लागते. विद्यार्थ्यांना चालत पाचकटेवाडी येथे यावे लागते. यामुळे मुली शिक्षण बंद करतात, असे चित्र असल्याचे येथील ग्रामस्थ पांडू देवणे यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित मंत्री आहेत. शहरी भागाबरोबरच वाडी वस्त्यांवर आरोग्य सुविधा कशा पोचतील. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर पालकमंत्री नात्याने जे धनगर वाडे मोठे आहेत. तिथे पर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते करण्याची विनंती देखील ग्रामस्थांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.