
Plans for a Rehabilitation Center Near Nandani : नांदणी गावातील माधुरी हत्तीणीवरून पेटलेल्या वादानंतर आता ‘वनतारा’ने माफी मागितली आहे. वनतारा प्रशासनाकडून बुधवारी निवेदन प्रसिध्द करण्यात आले असून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असेल, तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो, असे त्यात म्हटले आहे. तसेच माधुरी हत्तीणीसाठी नांदणी परिसरातच पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्तावही दिला आहे.
माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी वनतारातील अधिकाऱ्यांसी चर्चा केली. आता वनताराकडूनच अधिकृत निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनतारास असल्याचे त्यात म्हटले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो. माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, असे वनताराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. वनताराच्या कोणत्याही श्रेय, मान्यता किंवा हितासाठी हा प्रस्ताव नाही. ही केवळ शिफारस आहे, बंधनकारक किंवा लादलेली अट नाही, असे वनताराने स्पष्ट केले आहे. त्यापुढे जाऊन नांदणी मठास हवे असलेले सर्व सहाय्य करण्याची वनताराची इच्छा आणि तयारीही वनताराने दाखवली आहे.
* सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव
* पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे
* शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
* विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास
* साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा
* पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
* सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना
* माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
* पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.