Vidhansabha Election : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूर मध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील एकजूट दाखवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फलक लावत मतदारांसह विरोधकांना एकजूट दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
दिल्लीत आणि मुंबईत दोस्ती सुरू आहे. मात्र स्थानिक नेत्यांची गल्लीत कुस्ती सुरू आहे. असेच चित्र कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) दहा विधानसभा मतदारसंघात सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला नसला तरी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. मात्र मतदारसंघात महायुतीचे असणारे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत तर काही ठिकाणी समोरासमोर भिडले आहेत.
शिरोळ विधानसभा (Shirol Vidhansabha) मतदारसंघांमध्ये महायुतीतील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि भाजपचे शिरोळ मतदारसंघ प्रभारी राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. तर इचलकरंजी (Ichalkaranji Vidhansabha) विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने आणि महायुतीतील अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांच्यात उमेदवारीवरून चांगलीच जुंपली आहे. तर आमदार प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप खेळ सुरु झाला आहे.
कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध भाजप नेते समरजित घाटगे यांचा उघड उघड संघर्ष आहे. एकमेकांना पराभव करण्याचा वेढा दोघांनीही उचलला आहे. कोणत्याही थराला राजकारण जाण्याची भीती या मतदारसंघातून व्यक्त केली जाते. चंदगड, आजरा विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Constituency) राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भाजपचे नेते शिवाजी पाटील, संग्राम सिंह कुपेकर यांच्यात उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. प्रसंगी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राधानगरी भुदरगड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे. तर ए वाय पाटील हे पक्षालाच राम राम ठोकण्याच्या तयारीत आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे यांच्यात आतापासूनच उमेदवारीवरून ठिणगी पडली आहे.
जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे (Vinay Kore) यांनी करवीर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर महायुतीत वादाला ठिणगी पडली आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांनी देखील भाजपच्या नेत्यांना ठणकावत कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघावर दावा कायम केला आहे.
त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते कोल्हापुरात येऊन एकजूट दाखवत असतील तर गल्लीतील सुरू झालेली कुस्ती मिटवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागणार आहे. शिवाय पॅचअप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.