पंढरपूर : पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेनेने (Shivsena) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्ष नेत्यांकडे तशी मागणी केली आहे. त्यावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ (Anil Kokil) यांनी ही तसे आज (ता. २२ ऑगस्ट) संकेत दिले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. (Local body elections Shiv Sena will contest on its own)
शिवसेना फुटीनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पक्ष बांधण्यासाठी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. शिवसेना नेत्यांनाही पक्ष बांधणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनीही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर सांगोला येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी पक्ष नेत्यांकडे आग्रह धरला आहे. यावर आज शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांना विचारले असता, त्यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धाकधूक वाढली आहे.
कोकीळ म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेवर प्रचंड अन्याय झाला. कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढावे, असा आग्रह केला आहे. कार्यकर्त्यांची ही मागणी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवणार आहे. तसा निर्णय झाला तर शिवसेना सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर लढून जिंकेल, असा विश्वासही अनिक कोकीळ यांनी व्यक्त केला.
तानाजी सावंत आणि शहाजी बापू पाटील या दोन आमदारांनी गद्दारी केली असली तरी शिवसेना स्वतःच्या पायावर आजही भक्कमपणे उभी आहे. शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, असेही कोकीळ यांनी सांगितले.
या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, युवा सेनेचे प्रदेश विस्तारक प्रमुख शरद कोळी, युवासेना तालुका अधिकारी योगेश चव्हाण, माजी उपजिल्हा प्रमुख जयवंत माने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.