Satara News : सातारा जिल्ह्यातील विविध नऊ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्यातील बदललेली राजकिय परिस्थितीचा या निवडणुकीवर परिणाम जाणवणार आहे. खासदारांसह स्थानिक आमदारांनीही बाजार समितीची निवडणुक प्रतिष्टेची केली आहे. राष्ट्रवादीने सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप, शिंदे गट शिवसेनेचे नेते सरसावले आहेत. त्यामुळे ही निवडणुक चुरशी व प्रतिष्ठेची होणार आहे.
खासदार गटाला आमदार गट रोखणार....
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून खासदार गटाने यामध्ये लक्ष घालून काही संचालक निवडून आणले होते. यावेळेस खासदार गटाला बाजार समितीत प्रवेशापासून रोखण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने जय्यत तयारी केली आहे. सातारा पालिकेतील राजकारणातून दोन्ही राजांतील संघर्ष टोकाला गेलेला आहे. याचे पडसाद बाजार समितीच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहेत. त्यामुळे खासदार गट व आमदार गटांची दोन पॅनेल एकमेकांविरोधात लढणार आहेत. सध्या आमदार गटाची तयारी पूर्ण झाली असून खासदार गट उमेदवारांचा शोध धेत असल्याचे चित्र आहे.
महेश शिंदे, शशिकांत शिंदेंची प्रतिष्ठापणाला
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव करत मिळवलेली आमदारकी, नंतर जिल्हा बँकेची कोरेगावची जिंकलेली जागा या पार्श्वभूमीवर आता कोरेगाव बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. सद्या तरी या निवडणुकीबाबत प्राथमिक बोलणी सुरू आहेत. त्यातून शशिकांत शिंदे,बाळासाहेब पाटील, रामराजे नाईक - निंबाळकर, काँग्रेस तसेच आमदार महेश शिंदे, भाजप, डॉ. शालिनीताई पाटील यांचा गट यांच्यात दोन तगडी पॅनेल होतील. त्यामुळे दोन आमदारांच्या गटात चुरशीची लढत होणार आहे.
काँग्रेस, ठाकरे शिवसेना राष्ट्रवादीला साथ देणार....
वाई : बाजार समितीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सलग दोन पंचवार्षिक सत्ता राहिली आहे. तालुक्यातील अनेक विकास सेवा सोसायट्या आणि ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असा प्राथमिक अंदाज आहे. लोणंद व वाई बाजार समितीची निवडणूक एकाच वेळी लागल्याने बदलत्या राजकीय परिस्थितीत बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकत्र येऊन राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न निश्चित करतील. वाई विधानसभा मतदारसंघातील महाबळेश्वर व जावली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असल्याने या दोन तालुक्यात शिवसनेचे बळ कितपत बांधले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना, महविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीला साथ देणार का यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. भाजप, काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास काही प्रमाणात तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध काँग्रेस लढत रंगणार
कऱ्हाड : बाजार समितीत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील गट आणि भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांचा गट या निवडणुकासाठी एकत्र आल्याने माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील- उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यापुढे निवडणुक जिंकण्याचे मोठा आव्हान आहे. ॲड. उंडाळकर यांनी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधत समविचारी लोकांना एकत्र करुन ही निवडणुक लढवण्यासाठी फिल्डींग लावली आहे. गेली काही वर्षे विरोधात असणारे बाळासाहेब पाटील आणि भाजपचा भोसले गट जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत एकत्र आले होते. अनेक वर्षे या बाजार समितीवर उंडाळकर गटाचे वर्चस्व आहे. त्यांच्या नंतर ही पहिलीच निवडणुक होत असल्याने या गटासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
सत्तेसाठी भाजपला झुंजावे लागेल....
फलटण : कृषि उत्पन्न बाजार समितीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व अठरा जागा लढवणार का, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हॉस्पिटल, पेट्रोलपंप यासारख्या वैशिष्टयपूर्ण योजना राबविल्या आहेत. राज्यात या समितीचा नावलौकिक असल्याने व पूर्ण एक हाथी सत्ता राजे गटाची आहे. तरीही बदलत्या राजकिय परिस्थितीत भाजप येथे सत्ता मिळवण्याची स्वप्ने पहात असेल तर त्यांना कंबर कसावी लागणार आहे. राजे गट सहजा सहजी ही बाजार समिती सोडणार नाही.
राष्ट्रवादी विरुद्ध सेना-भाजप सामना रंगणार...
लोणंद : बाजार समितीवर सध्या आमदार रामराजे नाईक - निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या गटाच्या पॅनेलची सत्ता आहे. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यात भाजपचीही ताकद बऱ्यापैकी वाढली आहे. शिवसेना व भाजप अन्य नाराजांना एकत्र करुन ही निवडणूक झाली तर राष्ट्रवादीला सत्ता राखण्यात नाकीनऊ येऊ शकते. कॉंग्रेसचे नेते कै. ॲड. बाळासाहेब बागवान यांच्या निधनानंतर तालुक्यातील कॉंग्रेसची ताकद कमकुवत झाली आहे. त्यामुळे लोणंद बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना - भाजप असाच सामना रंगणार आहे.
तीन आमदारांचे राजकीय कसब पणाला
कुडाळ : जावळी- महाबळेश्वर बाजार समितीवर आजपर्यंत आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तिघांनी आपल्या कार्यकत्यांची वर्णी लावण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर राष्ट्रवादीचेआमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व आहे. मात्र सध्या येथील राजकीय समीकरणे बदलली असून नेतृत्व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असल्याने यावेळेस या निवडणुकीत जावलीकरांना संघर्ष पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील बाजार समितीत सत्तांतर करून ती भाजपाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाकडून होऊ शकतो.
देसाईंच्या भूमिकेवर ठरणार रणनिती...
पाटण : गेली ३० ते ३५ वर्षे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाटण बाजार समिती कार्यरत आहे. एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असुन निवडणुकीमुळे वातावरण तापणार आहे. या निवडणुकीसाठी शंभूराज देसाई पॅनेल उभे करून प्रतिष्ठा पणाला लावतात की साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल न करण्याच्या घेतलेल्या भूमिकेची परतफेड करतात. हे प्रत्यक्ष निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल होताना समजणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एक वर्षापासून या निवडणुकीची तयारी केली आहे. मंत्री देसाई यांनी पॅनेल उभे केले नाही तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.