Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघ कोण लढविणार? यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी ही काँग्रेसच्या भूमिकेने अस्वस्थ आहेत. त्यामुळे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्टून वॉर रंगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगलीत आघाडीत निर्माण झालेली बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उकळ्या फुटल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Election 2024)
सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. अद्याप जिल्ह्यात काँग्रेसचा गट मोठ्या प्रमाणात कार्यरत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने विश्वासात न घेता सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी लोकसभेची तयार केली होती. मात्र, परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असून, हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे एक व्यंगचित्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाज माध्यमावर टाकले. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करत असून, चंद्रहार पाटील यांना साथ देण्याचे आवाहन करण्याचे दाखविण्यात आले होते, तर समोरच्या गर्दीतून सांगलीत मशाल नाय, विशालच असे लोक बोलत असल्याचे दाखविण्यात आले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉटसअॅपवर माध्यमावर सांगलीत शिवसेनेची ताकद काय? एक ग्रामपंचायत तरी त्यांनी जिंकली आहे काय? असे प्रश्न विचारणारा मजकूरही फिरत असल्याचे दिसून आले होते. याला ठीक-ठिकाणी काही शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर देताना दिसून आले. मात्र, सायंकाळी अचानक दोन व्यंगचित्रे शिवसैनिकांनी (Shiv Sena) समाजमाध्यमांवर प्रसारित केलेले व्यंगचित्र, त्याच्या उत्तरात शिवसेनेकडून माध्यमांवर फिरवायला सुरुवात केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही ही चित्रे समाजमाध्यमांवर टाकली.
त्यामध्ये विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांचा किती मतांनी पराभव झाला आहे, याचा उल्लेख करण्यात आला होता. शिवाय व्यंगचित्र ही आमच्या पक्षाची खासियत आहे. कुंचल्यातून पक्षाचा जन्म झाला आहे, त्यामुळे आमच्या हत्याराचा वापर आमच्यावर करताना दहा वेळा विचार करायचा, असा सल्लाही देण्यात आलेला दिसून आला. दोन मित्रपक्षांनी एकमेकांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पणीने भाजप (BJP) कार्यकर्त्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटणारी ठरली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.