Shivsena Vs BJP: भाजपचा हस्तक्षेप झुगारण्यासाठीच सीएम नॉट रीचेबल, शिंदे गट एकवटला

Eknath Shinde News: महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवारही आपण सांगतील तेच असले पाहिजेत, या भाजपच्या भूमिकेमुळे शिंदे गटात तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. त्यातील काही उमेदवार बदलावेत, असा आग्रह भाजपचा असल्याचे सांगितले जात आहे.
CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde, DCM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) काही जागांवरून महायुतीतीतल अंतर्गत धुसफूस टोकाला गेली आहे. यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 29 मार्चला काही तास नॉट रीचेबल झाले होते. वाद असलेल्या जागांमध्ये उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ आपल्याला मिळेल, याबाबत मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी दुपारपर्यंत आश्वस्त होते, मात्र नंतर चक्रे फिरली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजितदादा पवार गट) त्यात एन्ट्री झाली, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले काही उमेदवार बदलण्याचा आग्रह भाजपने त्यांच्याकडे सुरू केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपच्या (BJP) वर्चस्वाला झुगारून लावण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. मुख्यमंत्री नॉट रीचेबल होणे, हा त्याचाच एक भाग होता, असे सांगितले जात आहे.

उस्मानाबाद (Osmanabad) मतदारसंघ कोणाला सुटणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निरोप केव्हा येईल, याकडे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. महाविकास आघाडीतील (MVA) ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी प्रचार सुरू केला आहे. माझ्याविरोधात लढण्यासाठी महायुतीकडे उमेदवार नाही, असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. निवडणुकीत विरोधकांना खिजवण्यासाठी, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी उमेदवारांकडून असे फंडे वापरले जातात. राजेनिंबाळकरही असेच करत असावेत, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, आता महायुतीतील घोळ पाहिला की नागरिकही संभ्रमात पडले आहेत. माझ्याविरोधात उमेदवार नाही, हा नॅरेटिव्ह सेट करण्यात राजेनिंबाळकर यशस्वी झाले तर महायुतीच्या उमेदवाराला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उस्मानाबाद मतदारसंघ कोणाला आणि उमेदवार कोण, याबाबत अक्षरशः गुऱ्हाळ सुरू आहे. जागा भाजप (BJP) सोडवून घेणार आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी उमेदवार असणार, हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) यांनी या जागेसाठी हट्ट धरला. हा प्रश्न या पक्षांनी प्रतिष्ठेचा केला. महायुती असली तरी उर्वरित दोन्ही पक्षांचे उमेदवार आपल्याच मर्जीतील असावेत, अशी काळजी उमपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून घेतली जात आहे. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तरी उमेदवार प्रवीणसिंह परदेशीच असतील, अशीही चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. आता निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. निलंगेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असून, त्यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. जागा कुणालाही सुटली तरी उमेदवार आपलाच असला पाहिजे, या देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाला अशा चर्चांमुळे पुष्टी मिळत आहे.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : निष्ठावंत शिवसैनिक प्रचार थांबविण्याच्या मनस्थितीत, सांगलीचा वाद कोल्हापुरात

उस्मानाबादचे विद्यमान खासदार शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी आग्रही मागणी शिंदे गटाची सुरुवातीपासूनचीच आहे. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळीच त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे आता प्रा. गायकवाड यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हेही आपले पुतणे धनंजय सांवत यांना उमेदवारीसाठी आग्रही आहेत. गुरुवारी सकाळी प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी जागा आपल्यालाच सुटणार, असे शिंदे यांनी त्यांना आश्वस्त केले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळपासून पुन्हा घडामोडी वाढल्या. जागा राष्ट्रवादीला सुटणार आणि प्रवीणसिंह परदेशी उमेदवार असणार, अशी चर्चा सुरू झाली. परदेशी यांच्यापाठोपाठ अरविंद निलंगेकर यांचे नाव चर्चेत आले.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
Nilesh Lanke On Ajit Pawar : "...म्हणून अजितदादांची माफी मागितली," राजीनाम्यानंतर लंकेंची प्रतिक्रिया

उस्मानाबादसह अन्य काही जागांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये पेच निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या यादीवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी भाजपची धडपड सुरू आहे आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemat Patil) यांच्याही नावाला भाजपने आक्षेप घेतला होता. पाटील यांच्या पत्नींना उमेदवारी द्यावी, अशी सूचना भाजपने केली होती, असे सांगितले जात आहे. शिंदे गटाने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यातील काही उमेदवार बदलावेत, असा आग्रह भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुरू केला आहे. या सर्व बाबींना कंटाळून मुख्यमंत्री शिंदे 29 मार्च रोजी काही तास नॉट रीचेबल झाले होते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
Dharashiv loksabha News : शिंदेंनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिवचा तिढा अखेर सुटला: 'या' पक्षाला मिळणार जागा, पण...

लोकसभा निवडणुकीत भाजप इतके वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असेल, तर विधानसभा निवडणुकीत काय होईल, असा विचार शिंदे गटात सुरू झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील सर्व नेते, मंत्री, आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे एकवटले आहेत. आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे वर्चस्व झुगारून लावावे लागेल, अशी चर्चा आता शिंदे गटात सुरू झाली आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीलाही भाजपकडून विरोध सुरू झाला आहे. उस्मानाबाद मतदारसंघातही असाच प्रकार सुरू असल्याची भावना शिंदे गटात निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवार यादीववरील भाजपचे वर्चस्व झुगारून लावण्यासाठी शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे एकवटला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com