Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीची निश्चितता झाल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असणार याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा विरोध असताना राजू शेट्टी यांनी मागणी धुडकावून लावत 'एकला चलो'चा नारा दिला आहे.
महाविकास आघाडीमध्ये हातकणंगलेची जागा शिवसेनेला जाणार असल्याने राजू शेट्टी यांच्या भूमिकेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींना वेग आला असून नुकतीच कोल्हापूर शहरात राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांच्या घरात महाविकास आघाडीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 'एकला चलो'ची भूमिका घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील सरूडकर यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. (Lok Sabha Election 2024 News)
दोन दिवसांपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले मतदारसंघ सोडू नये, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. त्याशिवाय राजू शेट्टी यांनी देखील महाविकास आघाडीत येण्यास नकार दिल्यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले आहेत, अशा परिस्थितीत स्वतःच उमेदवार द्यावा, अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बुधवारी कोल्हापूर शहरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. व्ही. पाटील यांच्या घरी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार सुजित मिनचेकर, माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील सरूडकर, माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यावर प्रमुख नेत्यांचे एकमत झाले आहे. महायुतीची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार विनय कोरे यांच्यावर मदार आहे. मात्र याच भागातील उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. शिवाय शिराळा आणि वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार असल्याने तेथूनही त्यांना ताकद मिळू शकते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हातकणंगले आणि शिरूर तालुक्यातून माजी आमदार उल्हास पाटील (Ulhas Patil) आणि माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar), गणपतराव पाटील यांचे बळ सुद्धा ठाकरे गटाच्या पाठीमागे उभे राहू शकते. एकंदरीतच चर्चा यामध्ये करण्यात आली. शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित (आबा) सरूडकर यांच्या नावाची चाचणी करून सर्वांचे एकमत घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या बैठकीत महाविकास आघाडीमध्ये या लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे एकमत ठरले असून लवकरच मातोश्रीवरून उमेदवारीची घोषणा होणार असल्याचे संकेत ही या बैठकीच्या निमित्ताने देण्यात आलेत.
(Edited By : Sachin Waghmare)