Satara Loksabha News : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे. यामध्ये सातारा लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे. त्यांनी काही कारणास्तव नकार दिल्यास त्यांच्या जागी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरुध्द महायुतीत श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटीलविरुद्ध महायुतीकडून उदयनराजे भोसले किंवा नितीन पाटील अशीच लढत पहायला मिळणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चिती लांबली होती. सातारच्या जागेवरुन महायुतीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली आहे. त्यांच्या संभाव्य नऊ उमेदवारांच्या यादीत सातारा लोकसभेसाठी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील किंवा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित समजले जात आहे. (Loksabha Election 2024 News )
महायुतीने जर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांनाच रिंगणात उतरविले जाणार आहे. त्याऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सोडल्यास त्यांच्याकडून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे उमेदवार असणार आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव निश्चित केले जाणार आहे.
श्रीनिवास पाटील यांचा सातारा लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून गावागावात त्यांनी विविध विकास कामे केलेली आहेत. तसेच ते पक्ष, संघटना यापेक्षा मतदारसंघातील निमंत्रण देणाऱ्या प्रत्येकाच्या लग्न समारंभास, तसेच मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहतात. त्यामुळे एक आश्वासक व अनुभवी चेहरा तसेच शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण या मतदारसंघात त्यांना सव्वा ते दीड लाखांवर मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांचा कराडचे दोन व पाटण या मतदारसंघात फारसा संपर्क नाही. येथील मतदारांत त्यांच्याविषयी नाराजी आहे. त्यामुळे त्यांना सातारा-जावळी, कोरेगाव व वाई-खंडाळा-महाबळेश्वर मध्येही मताधिक्य मिळाले तरी कराड व पाटणमधील तीन मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्याची भरपाई करु शकणार नाहीत. त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होऊन ही मते शरद पवारांच्या उमेदवाराकडे वळतील. त्यामुळे उदयनराजेंना खूप संघर्ष करावा लागेल.
बाळासाहेब पाटील (Balasheb Patil) हे उमेदवार असतील तर त्यांचाही कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटणमधून चांगले मताधिक्य मिळणार आहे. सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून कोरेगाव, सातारा तालुक्यात त्यांचा संपर्क आहे. तसेच खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा होणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांचे भवितव्य सध्यातरी चांगले असल्याचे चित्र आहे.
(Edited By : Sachin Waghmare)