Shinde Politic's : माढ्याच्या शिंदेंची मोहिते पाटलांना शेवटच्या क्षणी धोबीपछाड; जिल्हा बॅंकेच्या दुग्ध संस्था मतदारसंघावर मिळविला वरचष्मा

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत दुग्ध संस्था मतदारसंघातील अवसायनातील ६२ संस्थांना विभागीय आयुक्तांकडून स्थगिती मिळाली. बबनराव शिंदे गटाच्या प्रयत्नांनंतर या संस्था पुन्हा मतदारयादीत समाविष्ट झाल्या.
Ranjitsinh Shinde-Babanrao Shinde
Ranjitsinh Shinde-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे प्रारुप मतदारयादीचे काम सुरू असताना राजकीय पक्षांकडून बैठका आणि स्ट्रॅटेजी आखली जात आहे. जिल्हा बॅंकेच्या दुग्ध संस्था मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे गटाने ताकद लावत अवसायनात काढण्यात आलेल्या तब्बल ६२ संस्थांना विभागीय आयुक्तांकडून स्थगिती मिळवित पुन्हा मतदारयादीत समाविष्ट केल्या आहेत, त्यामुळे या मतदासंघातील मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला धोबीपछाड देत शिंदेंनी वरचष्मा राखला आहे.

माढा तालुक्यातील ६२ सहकारी दूध संस्था अवसायनात काढण्याचा आदेश दुग्ध विभागाच्या सोलापूरच्या उपनिबंधकांनी दिला होता. त्या आदेशाला पुणे विभागीय दुग्ध सहनिबंधकांनी स्थगिती दिली आहे, त्यामुळे या संस्थांचे मतदार प्रतिनिधींचे ठराव झाले आहेत.

माढा तालुक्यातील ११७ दुध संस्था अवसायनात काढल्या होत्या, त्यापैकी ६२ दूध संस्थांवर चुकीच्या पद्धतीने अवसायनाची कारवाई झाली आहे, असे सांगून त्याविरोधात माढ्याचे शिंदेंनी पुण्याच्या विभागीय सहनिबंधकांकडे अपिल केले होते. पुण्याच्या सहनिबंधकांनी (दुग्ध) या ६२ संस्थांवरील अवसायानाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामळे आता मतदारसंघात माढ्याचे तब्बल ७५ मतदार झाले असून यातील बहुतांश शिंदे समर्थक मानले जातात. माळशिरसचे ५९ मतदार आहेत.

जिल्हा बॅंकेच्या दुग्ध संस्था मतदारसंघात आपल्या विचारांचे मतदार वाढवून माढ्याच्या शिंदेंनी मोहिते पाटलांचे वर्चस्व मोडीत काढल्याचे मानले जात आहे. कारण, जिल्हा बॅंकेच्या तीन मतदारसंघात मोहिते पाटलांचे वर्चस्व मानले जात होते. मात्र, दुग्ध संस्था मतदारसंघात शिंदेंनी वरचष्मा राखला आहे.

दरम्यान, या मतदारसंघातून सांगोल्यातील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आतापर्यंत प्रतिनिधित्व केले आहे. आता या मतदारसंघातील संख्याबळाचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नव्या समीकरणातून नवा उमेदवार मैदानात येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी डीसीसी निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पणन प्रक्रिया, बँका, पतसंस्था व इतर संस्था आणि दुग्ध संस्था अशा चार मतदारसंघांत मतदार प्रतिनिधीचा ठराव केला आहे. गेल्या वेळी माढ्याच्या वाट्याला दोन संचालकपदे आली होती? यावेळी किती येणार?, सोसायटीशिवाय दुसरा मतदारसंघ कोणता असणार? याबद्दल उत्सुकता आहे.

डीसीसी बँकेच्या तीन मतदारसंघांत मोहिते-पाटील यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष मतदार प्रतिनिधीचा ठराव झाल्यानंतर पणन प्रक्रिया मतदारसंघात ८६ पैकी माळशिरसचे १९, तर माढ्याचे १८ मतदार झाले आहेत. त्या खालोखाल बार्शीचे १२ मतदार आहेत. दुग्ध व पणन मतदारसंघात माढा तालुक्याने जोरदार एन्ट्री केल्याने आता माळशिरस तालुक्याचे वजन फक्त माळशिरस सोसायटी मतदारसंघापुरतेच राहिल्याचे दिसत आहे. माळशिरसची ताकद डीसीसीच्या निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभी राहते? यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून दिसतो.

डीसीसी बँकेची निवडणूक ही पक्षीय झेंड्यांच्या पलीकडची निवडणूक म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत ज्या ज्या विविध पक्षांच्या नेत्यांचे डीसीसीत सूर जुळले होते, ते बहुतांश नेते वयोमानाने थकले आहेत, काही नेते दिवंगत झाले आहेत. आता नव्या फळीतील नेत्यांचे सर्वपक्षीय सूर कसे जुळतात? यावर निवडणुकीची चुरस अवलंबून दिसते.

सोलापूर जिल्ह्यातील दुग्ध संस्था मतदारसंघाचे तालुकानिहाय मतदार

माढा...........................७५

माळशिरस...................५९

सांगोला ....................... ३१

पंढरपूर ........................१२

मोहोळ ......................... १०

बार्शी ..............................०७

मंगळवेढा........................... ०५

करमाळा ............................ ०४

दक्षिण सोलापूर ..................... ०१

उत्तर सोलापूर व अक्कलकोट : ००

एकूण .................................२०४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com