Kagal Assembly Constituency : कागल विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी पालकमंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांच्यातच खरी लढत होणार आहे.
राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट महायुतीसोबत गेला. त्याचे तीव्र पडसाद आता कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये उमटतना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघ (Kagal Assembly Constituency) हा राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. महायुतीमध्ये उमेदवारीची गोची निर्माण झाल्यानंतर भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली.
त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्यासोबत होत आहे. दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. घाटगे ही निवडणूक पवार विरुद्ध मुश्रीफ नेण्यास यशस्वी झाले आहेत. मात्र, निकालानंतर कागलची जनता कोणाला डोक्यावर घेणार? हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार संजय घाटगे, महायुतीचे नेते माजी खासदार संजय मंडलिक, हे पालकमंत्री यांच्यासोबत असताना देखील यंदाची मुश्रीफ यांची वाट खडतर बनली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची झालेली सभा, जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या मुळावर घातलेले घाव हे घाटगे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.
गेली पाच टर्म आमदार, दोन वेळा कॅबिनेट मंत्री, विकासकामांचा डोंगर इतकी भक्कम बाजू असतानाही मुश्रीफ यांना कडवी झुंज द्यावी लागत आहे. दरवर्षी मुश्रीफांना उभारी देणारा गडहिंग्लजमध्येही जनता दलाच्या स्वाती कोरे यांचे घाटगेंना बळ मिळाले आहे. जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेला इच्छुक असणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी मुश्रीफ यांच्याकडे आहे. आरोग्य संदर्भात कागलमधून केलेल्या विकास कामांमुळे त्यांची ओळख श्रावणबाळ अशी आहे.
विकासाची भक्कम बाजू त्यांच्या बाजूने असताना त्यांच्या दुसऱ्या फळीवरील नेत्यांमुळे मुश्रीफ अडचणीत सापडू शकतात. त्याचाच फटका यंदा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. शिवाय सातत्याने प्रचारार्थ केलेली आक्षेपार्ह वक्तव्याचा फटका देखील त्यांना बसू शकतो. शिवाय स्वर्गीय एन.डी पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची बहीणीने देखील त्यांच्यावर केलेली आगपाखड तितकेच महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, कागलमधील लढाई ही दोघांच्याही प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल या मतदारसंघात जवळपास निश्चित आहे. कागलची सत्ता मिळवण्यासाठी घाटगेंची धडपड सुरू आहे. तर कागलचा गड राखत सहाव्यांदा आमदार होण्यासाठी मुश्रीफांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, इथला मतदार कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार हे येत्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.