Sangli News: सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सर्वात जास्त चटके जत तालुक्याला बसतात. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांच्या यादीत जत तालुक्याचा समावेश नसल्याने जतमधील जनता आक्रमक झाली आहे. त्यांचा उद्रेक आज पाहायला मिळाला.
राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला, पण यामध्ये जत तालुक्याला वगळण्यात आल्याने जतचे तहसीलदार यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे निर्माण झाले होते.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात मिरज, शिराळा, खानापूर, कडेगाव या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक झळा बसत असलेल्या जत, कवठे महंकाळ, तासगाव, आटपाडी हे दुष्काळी तालुके वगळण्यात आल्याने सर्वानाच धक्का बसला. उर्वरित चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासाठी चार दिवसांपूर्वी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जत तालुक्यातील 65 गावांना अद्याप पाणीच मिळाले नाही. यावर्षी तर पाऊसच कमी झाल्याने परिस्थिती गंभीर आहे. तालुक्यातील 10 तलाव कोरडे पडले असून, जवळपास 30 पेक्षा अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी विधानसभा मतदारसंघातील आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदार विलास जगताप हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते. नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. मात्र, त्यानंतरही दुष्काळग्रस्त यादीत जत तालुक्याचे नाव न जाहीर झाल्यानंतर नागरिकांमध्ये राज्य सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळ जाहीर करताना शासनाने लावलेल्या निकषांमुळे सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, वाळवा, तासगाव या पाच तालुक्यांचा विचार केला नाही. मुळात ज्या ठिकाणी शेतकरी हवालदिल आहे, त्याच तालुक्यांचा दुष्काळ जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शासनाने तत्काळ निकष बदलून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.