

Mangalvedha, 05 April : पंढरपूर-मंगळेवढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण खासदार शिंदे यांनी ज्यांच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक ताकद लावलेले भगीरथ भालके, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढविणारे अनिल सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवेढ्यात उद्या (ता. 06 एप्रिल) होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी अनिल सावंत आणि भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे इच्छुक होते. मात्र, भालके यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीला नेत काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र, महाविकास आघाडीतील गोंधळ रोखण्यात खासदार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अपयशी ठरल्यामुळे राज्यात दोस्ती आणि पंढरपुरात कुस्ती, असे चित्र विधानसभा निवडणुकीत दिसून आलं होतं.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून, तर अनिल सावंत (Anil Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. भालके आणि सावंत यांच्यातील मत विभागणीमुळे भाजपचे समाधान आवताडे हे साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. सावंत यांना पडलेली मतेच भाजपच्या विजयास आणि भालकेंच्या पराभवास कारणीभूत ठरली होती.
विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला होता. त्याकडे प्रणिती शिंदे यांनी साेयीस्कररित्या दुर्लक्ष केले. मात्र, तेच पदाधिकारी पुन्हा शिंदे यांच्याजवळ दिसू लागले. पक्षविरोधी कारवाई केलेल्यांना प्रणिती शिंदेंकडून दिलेले अभय भालके समर्थकांना चांगलेच खटकले. त्यातून शिंदे आणि भालकेंमध्ये अंतर पडत गेले.
दुसरीकडे, पंढरपुरातील एका कार्यक्रमात माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भगीरथ भालके निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आले असते तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं, असे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीनंतर भालकेंनी सावंत यांच्याशी सलगी ठेवल्याचे परिणाम नगरपालिका निवडणुकीत दिसून आले. सावंत परिवार भालकेंच्या पाठीशी ताकदीने उभारल्यामुळे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. प्रणिता भालके मोठ्या फरकाने विजयी झाल्या.
दुसरीकडे मंगळवेढ्यातही भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले. मात्र झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
विधानसभा निवडणुकीला आणखी साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. पण सरकार दरबारी कामे होत नसल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिली, त्यामुळे सत्तेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका घेतल्यामुळे भगीरथ भालके हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांच्या मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपशी जवळीक साधली, त्यामुळे त्यांनीही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, तर काही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने त्यांनीही सत्तसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या मंगळवेढ्यात भालके आणि सावंत यांनी मेळावा बोलावला आहे. त्या मेळाव्यातून भालके आणि सावंत यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे एकत्र आहेत, त्यामुळे आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीचे चित्र कसे असणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.