Ramdas Athawale : आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षण द्यावे. तमिळनाडूमध्ये वेगवेगळी वर्गवारी करून 69 टक्के आरक्षण दिले. त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी वर्गवारी करून आरक्षण देण्याची गरज आहे.
असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणीही केली. सांगली (Sangli) येथील शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकार्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मंत्री आठवले बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आम्ही पहिली भूमिका मांडली.
मराठ्यांना आरक्षण म्हणजे सगळ्यांना आरक्षण असे नाही. ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे, अशांना आरक्षण द्यावे. याबाबत आमचे मंत्रालय विचार करीत आहे. यासाठी एक कमिशन नेमले होते. त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. दोन किंवा तीन वर्गवारीमध्ये हे आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. पण मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तरी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिले पाहिजे. यावर मार्ग म्हणून तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने आरक्षण दिले, त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. मनोज जरांगे-पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईला येण्याची गरज नाही, आरक्षण निश्चित मिळेल, परंतु सरकारला काहीसा वेळ द्यावा.
जरांगे - भुजबळ वाद मिटवावा...
आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरू असलेला वाद मिटला पाहिजे. दोघांनी एकमेकांवर टीका करून ताकद वाया घालवू नये. हा वाद एकदा मिटवण्याची गरजही आठवले यांनी व्यक्त केली.
(Edited by Amol sutar)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.