Delhi News : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा खासदार संजय सिंह यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्यात तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. ते तुरुंगातूनच या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत राज्यसभेच्या (Rajya Sabha) तीन जागांसाठी निवडणूक (Election) होणार आहे. संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह एन. डी. गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांची मुदत जानेवारीअखेरीस संपत आहे. या तिघांपैकी संजय सिंह व एन. डी. गुप्ता यांना पुन्हा पसंती देण्यात आली आहे.
सुशील कुमार यांच्या जागी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनाही लॉटरी लागली आहे. आपकडून त्यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर मालीवाल यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पहिल्यांदाच राज्यसभेवर जातील. 'आप'च्या (AAP) उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.
संजय सिंह यांना ऑक्टोबर महिन्यात ईडीने अटक केली आहे. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्यामार्फत दिल्लीतील कोर्टात राज्यसभा निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे व अर्जावर सही करण्याची परवानगी मागण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना सही करण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश तिहार जेल प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, आपचे राज्यसभेत दहा खासदार आहेत. त्यामध्ये राघव चढ्ढा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीतल ऐतिहासिक विजयानंतर पक्षाच्या सदस्यांची राज्यसभेतील संख्या वाढली. दिल्लीतूनही तीनही उमेदवार सहजपणे निवडून येतील एवढे संख्याबळ पक्षाकडे आहे. ही निवडणूक 19 जानेवारीला होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.