

Satara, 26 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक अभूतपूर्व गोंधळ आणि मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे राज्यभर चर्चेत आहे. त्याचे तीव्र पडसाद विधीमंडळात उमटले. एसपीचे निलंबन आणि उपसभापतींचे अधिकार यावरून त्या ठिकाणी नवा निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देऊन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले, त्यांनी या प्रकरणी मंत्री जयकुमार गोरे आणि पोलिसांवर गंभीर आरोप केल आहेत.
जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) निवडणुकीत आम्हाला मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करण्यात आला. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे हेच या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेतून आम्हाला उचलून महाबळेश्वरला नेताना घाटात एन्काउंटर करण्याचा पोलिस निरीक्षक अरुण देवकर आणि सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांचा डाव होता, असा आरोपही या दोघांनी केला. तसेच, या प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वरमधील आम्ही राहत असलेल्या हॉटेलची झाडाझडती घेतली. पण त्याच रात्री पहाटे पाच वाजता बापू शिंदेंनी माझे अपहरण झाले नाही, मी पक्षासोबत माझ्या मर्जीने आलो आहे, असे लेखी लिहून दिले होते. मात्र, त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आम्ही सभागृहाच्या जवळ पोचलो होतो. मात्र, पाेलिसांनी जबरदस्तीने आम्हाला उचलून नेले. आम्हाला दोघाला २५ पोलिसांनी पकडले होते. तरीही आम्ही मतदानासाठी सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हेरून आम्हाला उचलून नेले, त्यावेळी झालेल्या झटापटीत आमची कपडे फाटली. त्याच अवस्थेत आम्हाला पाठीमागच्या दरवाजातून बाहेर नेण्यात आले.
आम्ही मेढ्याच्या पुढे आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांना एक फोन आला. त्या वेळी गर्जेंनी ‘कामगिरी फत्ते झालीय आणि पुढचे मिशन फत्ते करून येतो, जयाभाऊ’ असं ते म्हणाले. त्यानंतर माझ्या मनात भीती निर्माण झाली. मेढा-महाबळेश्वर मार्गावरील घाटात पुन्हा फोन आला. गाडीत मागच्या बाजून बसलेल्या कर्मचाऱ्याने बॉसचा फोन आला असे सांगून तो अधिकाऱ्याला दिला. त्यांनी व्यवस्थित करतो, त्यांना घेऊन चाललोय, असे गर्जे फोनवर बोलत हेाता.
आमची जिल्हा परिषदेत झटापट सुरू होती, त्या वेळी दोन माणसं उडवायला लागली तरी चालेल. पण कुठल्याही परिस्थिती जिल्हा परिषदेचं अध्यक्ष-उपाध्यक्ष मशीन यशस्वी झालं पाहिजे, अशी चर्चा त्या वेळी होती. त्या घाटात आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा डाव होता. पण झेडपीत भाजपची सत्ता स्थापन झाल्याचा फोन आल्यानंतर त्यांनी मत बदललं, असा गंभीर आरोप अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.