

Satara, 30 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील नेत्यांमध्ये कोण कोणाला त्रास देतो, कोण कोणावर कोठे नेम धरतो, अशा चर्चा बँकेच्या वर्तुळातून बाहेर येत नाहीत. सहकाराचे हे मंदिर असलेली जिल्हा बॅंक पक्षविरहित ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न अनेकदा दिसून आला आहे. त्यानुसारच ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मातब्बरांनी त्याचीच पुनरावृत्ती केल्याचे दिसून आले. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व इतर मातब्बर संचालकांनी बॅंकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेला आवर्जून उपस्थिती लावली. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विद्यमान संचालक मंडळामध्ये खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. तसेच आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने ‘मतपेरणी’चा प्रयत्नही या सभेच्या निमित्ताने दिसून आला.
सभेत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी भाषणात बॅंकेच्या अधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षात सर्व संचालकाचे विशेषत: खासदार उदयनराजेंही आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळाले, त्यांचा आम्हाला कसलाच त्रास नसतो, असे नमूद करत एकच हशा पिकवला.
तोच धागा पकडून ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘आज सभेत बराच वेळ उदयनराजे बसलेले आहेत, तेच महत्त्वाचे आहे. महाराज आपले दर्शन निदान त्रास देण्यासाठी तरी घडू नये, अशी माझी विनंती आहे. शेवटी उदयनराजेंना बोलू शकणारा मी एकमेव माणूस आहे. बाकीचे कोणी धाडस करणार नाही. कारण आमचे ‘अमर प्रेम’ आहे, त्याला करायचे काय? असे म्हणताच एकच हशा पिकला.
मीही जास्त बोलत नाही, कारण माझे भाषण अशा वळणावर आले की मी भाषण थांबवतो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. जिल्हा बँकेची निवडणूक पळवापळवी करून होऊ नये, म्हणून सर्वांनी एकत्र बसून निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत बॅंकेबद्दल दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून जे चांगले कामकाज केले ते पुन्हा करण्यास संधी द्या, अशी अपेक्षा रामराजेंनी व्यक्त केली.
शिवेंद्रराजेंची गैरहजेरीची चर्चा
जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बॅंकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पहिल्यांदाच अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीची सभासदांत व काही संचालकांत दबक्या आवाजात चर्चा होती. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, सर्वाधिक ठराव शिवेंद्रसिंहराजेंकडे आहेत. निवडणूक लागण्याआधीची ही बॅंकेची शेवटची सभा असल्याने ते नेमके का उपस्थित नव्हते, याबाबत उलटसुलट चर्चा सभासदांत होती. यावर ते गोंदिया, गडचिरोली दौऱ्यावर असल्याचे शिवेंद्रराजेंच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.