सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची (दूध पंढरी, dudh pandhari) निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत राजकीय डावपेच आखत सत्ताधारी आघाडीला दणदणीत विजय मिळवून देणारे आमदार बबनराव शिंदे (baban shinde) आणि माजी मंत्री दिलीप सोपल (dilip sopal) यांनी आपण सोलापूर जिल्ह्याचे नवे श्रेष्ठी असल्याचे दाखवून दिले आहे. सत्ताधारी सर्वपक्षीय आघाडीकडून दूध संघाच्या निवडणुकीची श्रेष्ठी म्हणून शिंदे आणि सोपल यांच्यावर जबाबदारी दिली होती. ती त्यांनी ताकदीने पार पाडली आहे. (MLA Babanrao Shinde, Dilip Sopal are the new leaders of Solapur district)
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व पुन्हा मिळविले आहे. संघाच्या सतराच्या सतरा जागा पुन्हा सत्ताधारी आघाडीकडे आल्या आहेत. एक जागा बिनविरोध झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी मंडळींकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यात अपयश आले होते. त्यामुळे संघाची निवडणूक लागली होती. त्यातही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सूनबाई वैशाली साठे या कृती समितीकडून निवडणूक रिंगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली होती.
दरम्यान, सत्ताधारी मंडळींकडून आमदार शिंदे आणि माजी मंत्री सोपल यांच्यावर जिल्ह्याचे नवे श्रेष्ठी म्हणून निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पूर्वी ही भूमिका विजयसिंह मोहिते पाटील, (स्व.) गणपतराव देशमुख आणि सुधाकरपंत परिचारक यांच्याकडे असायची. सहकार क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध करण्याकडे त्यांचा कल असायचा. मात्र, विजयदादांनी मध्यंतरी भाजपध्ये प्रवेश केला, तर देशमुख आणि परिचारक यांच्या निधनामुळे राजकीय नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. ती जबाबदारी बबनदादा आणि सोपल यांनी या निवडणुकीत लिलया पार पाडली आहे.
दरम्यान, संघाच्या निवडणुकीत बबनराव आवताडे, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, रणजितसिंह शिंदे, वैशाली शेंबडे, योगेश सोपल हे क्रियाशील मतदारसंघातून विजयी झाले आहेत. छाया ढेकणे आणि निर्मला काकडे यांनी महिला मतदारसंघामधून बाजी मारली आहे. जयंत साळे हे अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून, राजेंद्रसिंह पाटील हे भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. दीपक माळी हे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून बिनविरोध निवडले गेले होते.
दूध पंढरीमधील विजयाबाबत माजी मंत्री आणि जिल्ह्याचे नवे श्रेष्ठी दिलीप सोपल म्हणाले की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यासह सर्वच मित्र पक्ष दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकत्रित होते. सर्वांची इच्छा ही जिल्हा दूध संघाची बिनविरोधची परंपरा पुढे सुरू ठेवावी, अशी होती. पण, निवडणूक बिनविरोध होण्यास काही कारणांमुळे अपशय आले. मात्र, माजी संचालकांवर दूध उत्पादकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले होते, त्यातूनच हा विजय झाला आहे. पण, आम्ही या निकालाने हुरळून जाणार नाही. जिल्हा दूध संघ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना यापुढील काळात करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघ सध्या अडचणीत आहे. त्यासाठी कोणालातरी दोष देण्यापेक्षा दूध संघाला अडचणीतून बाहेर काढणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कृती समितीलाही दूध संघ वाचवायचा होता आणि आम्हालाही दूध संघाच्या हिताचेच काम करायचे आहे. त्यामुळे कृती समितीला दोन जागा देण्याचे आम्ही मान्य केले होते. त्यातून बिनविरोधची परंपरा जपली गेली असती. पण, प्रत्यक्ष निवडणुकीतही मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखविला आहे. जिल्ह्यातील नेतेमंडळींच्य एकजुटीचे हे यश आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची काहीही चूक नाही. आम्ही त्यांना अर्ज माघारीसाठी वेळेवर निरोप देऊ शकलो नाही, असे आमदार तथा श्रेष्ठी बबनराव शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.