Ahmednagar Political News : सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, जवळपास सात-आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके आपल्या मतदारसंघातील नागरिकांना जिल्ह्यातील मोहटादेवी दर्शनाचा लाभ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देत आले आहेत. यंदाच्या उत्सवात याच कार्यक्रमात व्यग्र असताना भाजप आमदार राम शिंदे यांनी आमदार लंके यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुक करत आई मोहटादेवी लंके यांच्या मनोकामना पूर्ण करोत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
एवढेच नव्हे तर शिंदेंच्या गाडीचे सारथ्य स्वतः लंके यांनी करत गडावर जात एकत्र पूजा आणि आरती केल्याने जिल्ह्यातील मातब्बर विखे परिवारासाठी हा आगामी काळासाठी राजकीय सूचक इशारा मानला जात आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर जिल्हा हा नगर उत्तर आणि नगर दक्षिण दोन अशा लोकसभा मतदारसंघात विभागलेला आहे. यात सध्या नगर दक्षिणेतील राजकारणात वेगळ्याच घडामोडी घडत असून, सध्या सुरू असलेल्या घडामोडी या जिल्हावर आतापर्यंत नेहमीच वर्चस्व ठेवणाऱ्या विखे परिवारासाठी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आव्हान करणाऱ्या असणार आहेत का? याबद्दल आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. याला संदर्भनजीकच असलेल्या लोकसभा निवडणुका असून, विद्यमान खासदार सुजय विखे यांना 'स्वकिया'पासूनच उमेदवारीसाठीचे आव्हान उभे राहत असल्याचे पुढे येत आहे.
नगर दक्षिण लोकसभा 2024 निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर मविआपेक्षा मोठे आव्हान हे महायुतीमधूनच पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी फार पूर्वीच सुरू केलेली आहे, तर दुसरीकडे भाजप आमदार राम शिंदे यांनीही पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. मी पक्षाचा जुना आणि एकनिष्ठ असल्याचे म्हणत, राम शिंदे यांनी 'आयाराम-गयाराम' या वृत्तीवर बोट ठेवले आहे.
एकूणच या अनुषंगाने खासदार सुजय विखे यांच्या 2024 च्या उमेदवारीवर महायुतीमधूनच प्रश्नचिन्ह निर्माण होतात दिसत आहे. कारण काल (18 ऑक्टोबर) राम शिंदे यांनी मोहटादेवी गडावर जाताना वाटेत नीलेश लंके यांची भेट घेत त्यांच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या देवदर्शनाच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. नीलेश लंके हे लोकप्रिय आमदार असून, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, अशा 'सूचक' शुभेच्छाही दिल्या.
लंके-शिंदे या महायुतीतील दोन आमदारांची भेट मोठ्या चर्चेची झाली असून, लंके यांनी शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य करत मोहटादेवी गड गाठला आणि एकत्रित देवीची आरती केली. जिल्ह्यातील पक्षविरहित असलेले पालकमंत्री, ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात आपणास मोठी मदत केल्याची कबुली देत राम शिंदेंचे केलेले कौतुक हे विद्यमान पालकमंत्री विखेंना टोचणी मारणारे असेच म्हणावे लागेल.
त्याच बरोबर लंके आणि मी (राम शिंदे) हे कॉमनमॅन आहोत, हे शिंदेंनी आवर्जून सांगताना जिल्ह्यातील प्रस्थापित विखेंना हे दोन कॉमनमॅन आमदार आगामी काळात आव्हान निर्माण करू पाहत आहेत, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.