

Solapur, 07 November : पाण्याच्या समस्येला कंटाळून माढा तालुक्यातील तुळशी गाव विकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला होता. त्याअनुषंगाने सरपंच उपोषणाला बसले होते. तुळशी गावच्या मदतीला भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख धावून गेले आहेत. गावात ‘शिरपूर पॅटर्न’ राबवून गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार आमदार देशमुख यांनी बोलून दाखवला आहे.
पाणी टंचाईला कंटाळलेल्या तुळशी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ‘तुळशी गाव विकणे आहे’ असे जाहीर करून सरपंचांनी उपोषण सुरू केले हेाते. गावच्या नागरिकांनी जेव्हा गाव विकायला काढले आहे, हे मला जेव्हा समजले, तेव्हा मी ग्रामस्थांच्या भेटीसाठी तुळशी गावाला आलो होतो, असे देशमुख यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, तुळशीत गेल्यावर समजले की, 30 वर्षांपासून गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. तरीही गावात दररोज 35 ते 40 हजार लिटर दुधाचे उत्पादन करते. एकीकडे टँकरने पाणी पुरवठा होतो आणि तरीही हे गाव एवढे दूध उत्पादन करते हे विशेष आहे.
पाणी टंचाईतही दूध उत्पादनात आघाडीवर असलेले तुळशी गाव विकायला काढल्याचे कळताच शिरापूर पॅटर्न प्रमुख सुरेश खानापुरे यांना मी फोन केला. त्यांना गावात बोलावून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंधारे आणि पाण्याच्या स्वयंपूर्णतेचा प्लॅन तयार केला, असेही त्यांनी नमूद केले.
सुभाष देशमुख म्हणाले, तुळशी गावच्या पाण्याचा आराखडा तयार झाल्यानंतर खोदाईसाठी पोकलेन आणि हायवा पाठवून कामाची सुरुवात केली. शिरपूर पॅटर्न तुळशी गावात राबवायचा आहे, असा संकल्प आम्ही केला.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात गेल्या आठ वर्षांपासून आम्ही काम करत आहोत, त्या गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याच पद्धतीने आडाची वाडी गावाप्रमाणे तुळशी गावाला राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून द्यायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आमचे गाव दिवाळखोरीत निघाले आहे, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल ग्रामस्थांनी केला होता. मात्र त्यांची समजूत घालून आम्ही तुळशी गावात पुढील वर्षी धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.