Solapur Politic's : दक्षिण सोलापूरमधील ‘या’ सोसायटीबाबत सुभाष देशमुखांची मोठी मागणी; थेट निबंधकाला लिहिले पत्र

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदारयादीवर 370 हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. दक्षिण सोलापुरातील 14 सोसायट्यांच्या ठरावांवर आक्षेप असून सुभाष देशमुखांनी भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.
Solapur Dcc Bank
Solapur Dcc BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 02 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठीची प्रारुप यादी जाहीर झाली असून त्यावर एकूण ३७० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूर केंद्रस्थानी असून १४ सोसायट्यांच्या ठरावांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, माजी सहकार मंत्री तथा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) सोसायटीचा ठराव रद्द करण्याची मागणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली आहे, त्यामुळे बॅंकेच्या निवडणुकीत शह-कटशहाचे राजकारण रंगले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये गोपाल सोमण्णा जंगलगी यांच्या नावाचा ठराव झाला आहे. मात्र, या ठरावाच्या प्रक्रियेवर आणि पद्धतीवर आमदार सुभाष देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे.

आमदार सुभाष देशमुख यांनी सहाय्यक निबंधकाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये केडरने गट सचिवाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आपल्या आदेशाप्रमाणे संस्थेला सचिव नेमता येत नाही. भंडारकवठे सोसायटीने आपल्याकडे व सहाय्यक निबंधक यांच्याकडे तशी परवानगीही मागितलेली नाही.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठविण्यासाठी बोलावण्यात आलेली संचालक मंडळाची सभा, त्यात झालेला ठराव इत्यादी सर्व प्रक्रिया अवैध आहे, असे वाटते. त्यामुळे भंडारकवठे सोसायटीत प्रतिनिधीचा झालेला ठराव रद्द करण्यात यावा. केडरने नियुक्त केलेल्या आणि केडरने सुचवलेल्या गट सचिवाच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेसाठी मतदार प्रतिनिधी नियुक्तीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

Solapur Dcc Bank
Solapur Dcc Bank : कर्नाटकातील व्यक्तीचा सोलापूर DCC बॅंकेसाठी ठराव; भाजपतील बड्या नेत्याच्या समर्थकांकडून ‘दक्षिण’मधील ठरावांवर हरकती

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल १४ सोसायट्यांच्या ठरावावरही हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गावाचा रहिवासी नसणे, सोसायटीत सभासद नसणे, संबंधित गावात जमीन नसणे असे आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यामुळे त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

दुग्ध संस्था मतदारसंघ चर्चेत

सोलापू्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुग्ध संस्था प्रतिनिधी मतदारसंघात सर्वाधिक हरकती आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या एकूण ३७० हरकतींपैकी साधारणत: निम्म्याहून अधिक हरकती दुग्ध संस्था मतदारसंघातील मतदारांवरून आल्याने हा मतदारसंघ हरकतींच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Solapur Dcc Bank
Satara Dcc Bank : सातारा Dcc च्या आखाड्यात 4 मंत्री, 2 खासदार, 3 आमदार, 2 माजी मंत्री, माजी खासदार-आमदार उतरले; बॅंकेच्या 21 जागांसाठी 236 अर्ज दाखल

माढा तालुक्यातील ६० प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था शेवटच्या टप्प्यात मतदार प्रतिनिधीच्या ठरावास पात्र ठरल्या होत्या. या संस्थांची नावे वगळावीत, अशी सांगोला तालुक्यातील तक्रार पारे येथील अजिंक्य सहकारी दूध उत्पादक संस्थेचे मल्हारी गायकवाड यांच्यासह ६० जणांनी घेतली आहे. पंढरपूर तालुक्यातील ६८ दुग्ध संस्थांनी आमची नावे प्रारूप यादीत घ्यावीत, अशी मागणी केली आहे. सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील दुग्ध संस्थांचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात सुरू आहे, त्यांनी हरकत घेत आमचीही नावे प्रारूप यादीत घेण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com