Solapur News : दोन पाटलांच्या वादात मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपद पुन्हा एकदा हुकले आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय उमेश पाटील यांच्याकडे हे पद येईल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. मात्र, माजी आमदार राजन पाटील यांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन पाटील यांच्याऐवजी दीपक साळुंखे हे नावे पुढे आले. असाच प्रकार एकसंघ राष्ट्रवादी असताना राजन पाटील यांच्याबाबत घडला होता. त्यामुळे गेल्या वेळी बळिराम साठे यांना, तर या वेळी साळुंखे यांना लॉटरी लागली. (Mohol lost post of District President of NCP due to dispute between two Patils)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी नाव चर्चेत असलेले लतीफ तांबोळी यांना प्रदेश पातळीवर नेत सरचिटणीस करण्यात आले आहे. मात्र, जे उमेश पाटील जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार होते, त्यांचे पद पुन्हा हुकले आहे. वास्तविक राष्ट्रवादीतील फुटीनंतर उमेश पाटील यांनी अजितदादांची पाठराखण करत सोलापुरात येऊन जल्लोष केला होता. त्यामुळे ते जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार होते. नव्हे तर त्यांच्याच नावाची सुरुवातीला चर्चा होती.
माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत असलेले तीव्र मतभेद उमेश पाटील यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या आडवे आले. त्यामुळे मोहोळची जिल्हाध्यक्षपदाची संधी पुन्हा एकदा हुकली. दुसरीकडे ही उमेश पाटील यांचीच खेळी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. जिल्हाध्यक्षपद स्वीकारले असते, तर राजन पाटील यांच्याशी उघडपणे दोन हात करता आले नसते, त्यामुळे उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदासून दूर राहून मोहोळचे मैदान आपल्यासाठी मोकळे ठेवले आहे, असाही सूर तालुक्यातून निघत आहे.
दुसरीकडे एकसंघ राष्ट्रवादी असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सोलापूर दौरा आणि हुतात्मा स्मृती मंदिरातील सभा यशस्वी करण्यात माजी आमदार राजन पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. पक्षातील अनेक मातब्बर नेते सोडून जात असताना ते पवारांच्या पाठीशी कायम होते, त्यामुळे राजन पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होतील, अशीच हवा पवारांच्या दौऱ्यानंतर होती. मात्र, या दोन पाटलांमधील मतभेद पहिल्यांदा आडवे आले आणि राजन पाटलांचे जिल्हाध्यक्षपद हुकले.
त्यावेळीही दोन्ही गटातील संघर्ष टाळण्यासाठी बळिराम साठे यांना जिल्हाध्यक्षपद करण्यात आले होते. त्यांच्या जोडीला उमेश पाटील आणि राजूबापू पाटील यांना कार्याध्यक्ष करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी उमेश पाटील यांनी टाकलेले फासे उलटे पडले आणि त्यांचे गणित फसले. या दोन्ही पाटलांच्या वादात मनोहर डोंगरे यांच्यानंतर मोहोळ तालुक्याला आलेली जिल्हाध्यक्षपदाची संधी दोनवेळा हुकली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.