Viraj Shinde Vs Makrand Patil : 'झाडाणी प्रकरणातील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या रिसॉर्टला वीज पुरवठा करण्यासाठी वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पदाचा व शासकीय निधीचा गैरवापर केला आहे.' असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदेंनी केली आहे.
तसेच 'जिल्हा नियोजन समितीतून 22 केव्ही एचटी लाईन टाकून वीज पुरवठा देण्यासाठी तब्बल 51 लाख 86 हजार 540 रुपयांचा निधी वापरला आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर कारवाई करावी.', अशी मागणीही केली आहे.
यासंदर्भात विराज शिंदे यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कागदोपत्री पुराव्यासह पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी हे गाव पुनर्वसित झाले असून या ठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही. येथील ग्रामस्थांचे रायगडला पुनर्वसन झाले आहे.
मात्र, या गावात नंदूरबार, अहमदाबाद, गुजरात, मुंबई येथील काही बड्या अधिकाऱ्यांनी व राजकीय वलय असलेल्यांनी एकत्रितपणे मोठ्याप्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या ठिकाणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी सालोशी येथील वळवी वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांच्या नावे बांधकाम केले आहे.
तर असा आरोप करण्यात आला आहे की, 'सलोशी येथील वळवी व सावे वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांनी सुमारे 40 एकर परिसरात बेकायदेशीर बांधकाम करुन रिसॉर्ट बांधले आहे. त्यासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली आहे. या रिसॉर्टला वीज पुरवठा देण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून 51 लाख 86 हजार 540 रुपयांचा निधी येथे वापरला आहे.'
तसेच 'या निधीचा वापर करुन त्यांनी 22 केव्ही एचटी लाईन पाच किलोमीटर ओढली आहे. तसेच 0.35 किलोमीटर एलटी लाईन टाकली आहे आणि या रिसॉर्टला वीज पुरवठा केला आहे. वीज वितरण कंपनीने आमदार मकरंद पाटील यांच्या शिफारसीने वीज पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. मुळात वळवी वस्ती अस्तित्वात नसूनही आमदार मकरंद पाटील यांनी पदाचा गैरवापर करुन व अधिकाऱ्यांवर दबाव आणून रिसॉर्टला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नियोजन समितीकडून दिला गेलेला हा निधी बेकायदेशीरपणे स्वत:च्या फायद्यासाठी वापरला आहे.' असंही आरोपात म्हटलं आहे.
या परिसरात आजही खिरखिंड, म्हाळुंगे, शेलटी, देऊर, तळदेव, मायणी ही गावे अस्तित्वात असून त्यांना आजही विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे या विद्युतीकरणाची चौकशी व्हावी. तसेच आमदार मकरंद पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाइ करावी. त्यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची आमदारकीही रद्द करावी, अशी मागणी विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
याबाबत ते सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मकरंद पाटील यांना पदमुक्त करावे, अशी मागणी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत, असे सांगून विराज शिंदे यांन म्हटले की, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली बेकायदेशीर कामे केली आहेत. त्यांच्यावरही कारवाई करावी.
झाडाणीला अनेक ठिकाणी शासकिय योजनेतून अनेक रोड व साकवाची कामे धनिकांच्या सोयीसाठी शासकिय निधीचा वापर केला आहे. त्यामुळे मकरंद पाटील हे जननायक नसून लाभ नायक आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी. आम्ही जिल्हा काँग्रेसच्यावतीने त्यांचा निषेध करत आहोत, असेही विराज शिंदेंनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.