Satara News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात फुटीनंतर एकाच पक्षातील दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार आणि रोहित पवार हेदेखील अनेकदा आमने-सामने आले.
रोहित पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार गटावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निशाणा साधला जात आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत 'ताकद लावा, बदनाम करा... तरीही महाराष्ट्रात अजित पवारांनाच मोठ्या प्रमाणावर पाठबळ वाढत आहे, हे आगामी निवडणुकीत 100 टक्के सिद्ध होईल', असं प्रत्युत्तर तटकरेंनी दिलं.
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सुनील तटकरे यांनी आदरांजली वाहिली. यानंतर कराड येथील विमानतळावर खासदार तटकरे बोलत होते. ते म्हणाले, रोहित पवारांना आलेली नोटीस ही त्यांच्या कारखाना, संस्थेच्या संदर्भात असून तपास अनेक महिने सुरू आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाचा दुरान्वयाने संबंध नाही.
अजितदादांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत असल्याने कल्पोलकल्पित काही कथा तयार करून आम्हाला निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीसुद्धा असा अजून कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रात अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ वाढत असून हे आगामी निवडणुकीत 100 टक्के सिद्ध होईल, असं तटकरे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रोहित पवारांना ईडीची नोटीस देण्यामागे कोणतीही खेळी नाही. अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेमागे फार मोठ्या प्रमाणावर पाठबळ उभे राहिल्यानंतर केवळ संशय निर्माण करणं, आम्ही घेतलेल्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणं, भारत सरकारच्या यंत्रणा अनेक वर्षे काम करीत आल्या आहेत, आता आम्हाला बदनाम करण्यासाठी वक्तव्य होत आहेत. रोहित पवारांवरील कारवाई आणि तपास यापूर्वीपासूनच सुरू झालेला आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय खेळी यामागे नसल्याचे खासदार तटकरेंनी सांगितले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करीत बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करून कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयांत खरेदी केला होता. याप्रकरणी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केली होती. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ईडीने रोहित पवार यांच्या कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे.
(Edited By Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.