Kolhapur News, 22 Jul : कोल्हापुरातील नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला दोन आठवड्यांत गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे सूचित करण्यात आले होते.
मात्र, मठ संस्थानने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदविताना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नांदणी येथील ‘महादेवी हात्तीणी’ला गुजरातच्या जामनगरमधील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले होते.
या आदेशावर महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली. वनविभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत या हत्तीणीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या ‘पेटा’ संघटनेने केला होता. न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर 2024 मध्ये हत्तीणीच्या तपासण्या करून अहवाल सादर केला होता.
नांदणी या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील जैन समाजाच्या 748 गावांचे पुरातन मठ आहे. या मठाचा इतिहास जवळपास 1200 वर्षापासूनचा आहे. या मठामध्ये जैन समाजात ज्यांना धर्मगुरू व राजाचा मान दिला जातो असे जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकापासून परंपरागत या मठामध्ये हत्ती सांभाळलो जातो.
या मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गावामध्ये ज्या वेळेस पंचकल्याण पूजा होतात तेंव्हा या पुजेतील इंद्र-इंद्रायणींना या हत्तीवरुन भगवंताच्या अभिषेक व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान आहे. देशभरात जेंव्हा वन्यजीव (संरक्षण) कायदा 1960 दीर्घ शीर्षक: देशाची पर्यावरणीय आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचे संरक्षण आणि त्यांच्याशी संबंधित कायदा करण्यात आला.
तेंव्हापासून ते आज अखेर या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत या हत्तीचे संगोपन व पालनपोषण केले जाते. अंबानी उद्योग समुहाने गुजरात जामनगर येथे प्राणी बचाव केंद्र, काळजी, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी या केंद्रामध्ये शिकाऊ प्राण्यांची गरज असल्याने अशा पध्दतीने ट्रेनिंग दिलेले हत्ती याठिकाणी नेले जात आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षापासून नांदणी मठातील हत्ती सदर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी प्राणी मित्र संघटना, न्यायालय व राजकीय दबाव वापरून हत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक प्रयत्नानंतरही हत्ती घेऊन जाण्यास अपयश आल्याने शेवटी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अंबानी यांच्या वनतारा येथे हत्ती पाठविण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येक नियमावली प्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा चांगल्या पध्दतीने संगोपन करूनही, सर्व कागदोपत्री माहिती देऊनही न्यायालयाने केलेल्या प्रत्येक गोष्टींचा सविस्तर खुलासा होऊनही न्यायव्यवस्थेने एकतर्फी निकाल देऊन तातडीने हत्तीची रवानगी वनतारा इथे करण्यास सांगितले.
हत्तीसाठी ज्या सोयी सुविधा वनतारा या ठिकाणी केली जाणार आहे. त्या पद्धतीनेच या मठामध्ये गेल्या अनेक दशकापासून त्याचे संगोपन व पालनपोषण केले जाते. न्याय व्यवस्थेलाही बटीक करून वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला आहे. ज्यावेळेस अनेक दशकापासून याठिकाणी हत्ती पाळले जात होते.
तेंव्हा कोणत्याही प्राणिमित्र संघटना ,प्रशासनाने कधीही हारकती घेतली नाही. मात्र अंबानी यांचा वनतारा हा प्रकल्प झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणीमित्र संघटना, प्रशासन, अंबानी उद्योग समुह अनेक राज्यकर्ते यासाठी प्रतिष्ठा पणाला लावले आहेत ही बाब अत्यंत खेदजनक आहे. पैसा व संपत्तीसमोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षाची संस्कृती व परंपरा मोडण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
नांदणी जीनसेन स्वस्ति हा जैन समाजाचा मठ आहे. आपल्या अनेक वर्षाची परंपरा असून त्या ठिकाणी हत्ती आहे. दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे मात्र सरकार आता सर्वच हत्ती वनतारा घेऊन जाण्याचे नियोजन करत आहे. हत्ती घेऊन गेले तर सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. सरकारने याचा फेरविचार करावा.
सरकारने धोरणात्मक विचार न घेता त्या हत्ती संदर्भात काय काळजी घ्यायची त्याच्या सूचना जैन समाजाला द्या. तुम्हाला हत्तीच घेऊन जायचे असतील तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूर, चंदगड मध्ये आहेत. ते शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे ते पकडून घेऊन जावे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. उच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात देखील हा समाज गेला आहे. तिथे असणाऱ्या हत्तीची निगा राखली जात नसती त्याच्यावर अत्याचार होत असतील तर कालची गोष्ट मान्य करायला काय हरकत नाही. मात्र तिथे स्वतःच्या जीवापेक्षा जैन समाज त्या हत्तीची काळजी करतो. जर अशा पद्धतीने जैन समाज काळजी घेत असेल तर तो त्या समाजावर अन्याय होत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.