
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत येण्याच्या प्रयत्नांना पहिले यश आले आहे. नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा यांनी एकत्रित दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी नांदणी मठाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतरच महादेवी हत्तिणीला गुजरात येथील वनतारा प्राणी देखभाल केंद्रात नेण्यात आले होते.
नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्तिणीला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. महादेवी हत्तीण याच परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती. या हत्तिणीशी परिसरातील नागरिकांची भावनिक नाळ जोडली गेली होती. पण काही दिवसांपूर्वी पेटा संस्थेच्या याचिकेद्वारे महादेवी हत्तीण गुजरात येथील वनतारा प्राणी देखभाल केंद्रात पाठवली जावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. ते सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.
महादेवी हत्तिणीला वनतारा केंद्रात नेल्यापासून पेटा संस्था, वनतारा संस्थेविरोधात कोल्हापूरमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला होता. कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. नांदणी ते कोल्हापूर मोर्चा काढण्यात आला. रिलायन्स इंडस्ट्रीजविरोधात मोहीम सुरु केली होती. हजारो नागरिकांनी जियो कंपनीचे सीमकार्ड पोर्ट करून आपला निषेध नोंदवला होता. त्यानंतर वनतारा संस्थेने कोल्हापूरमध्ये येऊन नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली.
यात राज्य सरकारनेही हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वनतारा प्रशासनासोबत चर्चा केली. यावेळी महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रित याचिका दाखल करण्यात येईल असा निर्णय झाला. राज्य सरकारही पक्षकार होईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. जनभावनेच्या रेट्यापुढे सर्वांनी एकत्रित येत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत यावर सुनावणी घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवाही ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठीच्या प्रयत्नांना पहिले यश आले आहे. यातून हत्तीण परत येणार असा एक आशेचा किरण दिसला आहे हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.