प्रभू वारशेट्टी
Solapur, 13 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी सोलापुरात आली होती. या शिवस्वराज्य यात्रेचे सोलापूर शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
त्या मेळाव्यात व्यासपीठावर स्थान मिळाल्याने सोलापूर (Solapur) शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले मातब्बर नेते तौफिक शेख (Taufiq Shaikh) यांनी कार्यक्रम सोडून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे विधानसभेच्या तयारीसाठी काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगल्याचे उघडपणे दिसून आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत वाट्याला येणाऱ्या संभाव्य मतदारसंघातून ही शिव स्वराज्य यात्रा (Shiv Swarajya Yatra) काढण्यात येत आहे. ही यात्रा सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरात दाखली झाली.
नियोजित वेळेपेक्षा ही शिवस्वराज्य यात्रा शहरात उशिरा दाखल होऊनही शहरातील मातब्बर नेते मंडळी झाडून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रात्री आठच्या सुमारास खासदार अमोल कोल्हे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यानंतर मंचावर येण्यासाठी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांची नावे घेण्यास सुरुवात केली.
शहरातील बहुतांश नेत्यांची नावे सूत्रसंचालकाने घेतली. मात्र, त्यांच्याकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे नाव घेणे राहून गेले.
ही बाब तौफिक शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी भर कार्यक्रमात फोन आल्याचे दाखवत फोनवर बोलत निघून जाणे पसंत केले. त्यानंतर अनेक वेळा तौफिक शेख यांचे नाव पुकारूनही ते कार्यक्रम स्थळी पुन्हा आले नाहीत. मेळाव्यात झालेल्या मानापमान नाट्यावरून तौफिक शेख चांगलेच नाराज झाल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
कोण आहेत तौफिक शेख?
तौफिक शेख हे सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तौफिक शेख एमआयएम पक्षात होते. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून एमआयएमकडून त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना 37 हजार मते मिळाली होती. आताही ते सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छूक आहेत.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.