

Solapur, 21 August : भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक सोलापुरात झाली. या बैठकीतून भाजपने आपली आगामी राजकीय दिशा स्पष्ट करताना विस्तारवाढीसाठी पुन्हा मित्रपक्षासह शरद पवारांची राष्ट्रवादीच टार्गेटवर असणार हे निश्चित केले आहे. बहुतांश नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रिया आणि भाषणातून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याची सुरुवात जिल्हा बॅंकेपासून होऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत टोकाचा संघर्ष राष्ट्रवादीशीच होण्याची शक्यता दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीला पुणे वगळता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमधील बहुतांश नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शनासाठी येणार होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘एसआयआर’च्या मुद्यावर आपल्याच लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले. एसआयआरच्या मुद्यावर तडजोड करू नका, काहींचे काम अत्यंत असमाधानकारक आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी एसआयआरवर भर दिला. मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे पदवीधर निवडणुकीबाबत भाष्य केले. आपण प्रतिनिधीत्व केलेला पुणे मतदारसंघ मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने खेचून नेला, याचे मोठे शल्य त्यांच्या मनात असल्याचे कालच्या बैठकीत दिसून आले. तो पुन्हा मिळावा, यासाठी पदवीधर नोंदणी महत्वाचे असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. पण घोडे तिथेच पेंड खात आहे.
भाजपच्या बैठकीत कोल्हापूरमध्ये सर्वाधिक नोंदणी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या जूनअखेरच्या आकडेवारीत ९१ हजार ३७८ एवढी नोंद झाली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचाही दावा आहे. मग भाजपची नोंदणी किती असा सवाल निर्माण होतो. तीच गत इतर जिल्ह्यांत आहे. सांगलीत ७६ हजार ७०९, पुणे जिल्ह्यात ६५ हजार २६४, सातारा जिल्ह्यात ४३ हजार ३७०, सोलापूर जिल्ह्यात ३९ हजार ४०७ एवढी पदवीधरांची नोंदणी झालेली आहे. त्यात भाजपचे मतदार किती हा संशोधनाचा विषय आहे.
या पाचही जिल्ह्यात भाजपला तोंड देणारे नेतृत्व मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला धूळ चारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकाली मृत्यू, शरद पवारांच्या फिरवण्यावर आलेले निर्बंध आणि नवे नेतृत्व तयार होण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे राष्ट्रवादीतील नेतेमंडळी सध्या संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांचे जाळे पाहता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असणार आहे. याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे.
दुसरीकडे बैठकीला आलेल्या नेत्यांनी त्याच दृष्टीने राष्ट्रवादीवर वार करायला सकाळपासूनच सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले धनंजय महाडिक यांनी तर सोलापूर जिल्ह्यात आता राष्ट्रवादीचे काही राहिले नाही, असा सूर आवळला. आमदार गोपीचंद पडळकर हे तर कट्टर पवारविरोधक असून त्यांचा राष्ट्रवादी विरोध कायम असणार, याचे भान महायुती असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आहे.
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हावभाव विशेष लक्षवेधी ठरले. त्यांनी स्पष्टपणे सांगूनच टाकले की, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता नाही. आता तो भाजपचा बालेकिल्ला आहे, हे सांगताना त्यांनी ‘होता’वर दिलेला जोर सर्वकाही सांगून जातो. मागील काही निवडणुकीची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी बॅकफूटवर गेलेली आहे, हे कोणीही नाकारणार नाही. पण महायुती असलो तर पदवीधरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच कुस्ती होण्याची शक्यता आहे. तशी तयारी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.