

Satara, 21 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील हुमगाव-आखाडे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये नुकतीच हाणामारी झाली. त्यानंतर जावळीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे जावळी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.
जावळीत आलेल्या शशिकांत शिंदे यांनी हुमगावच्या घटनेवर प्रथमच सविस्तर भाष्य करत विरोधकांच्या दादागिरीच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. हुमगाव प्रकरण ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ते चुकीचे असून, त्यामागे पूर्वनियोजित प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. दुसऱ्या दिवशी जे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहेत, ते बघितल्यावर असं वाटतंय की, शिवेंद्रराजेंनाही गैरसमज करून सांगितलेले आहे. संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना दिले असून, पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा दावाही शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
एका प्रकरणात गंभीर कलमे लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, या कारवाईला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ‘घरात जाऊन कोणाला उगाच त्रास देणे योग्य नाही,’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
‘हुमगाव-आखाडे माझेच गाव आहे. इंदवलीसह ही सर्व गावे माझीच आहेत. त्यामुळे मी दादागिरी किंवा वादाला प्रवृत्त होणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली. मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. १९९९ पासूनच्या दादागिरीच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य करत, चुकीचे वागणाऱ्यांना योग्य पद्धतीने (सरळ) वागवा, असे सांगतानाच कोण कुठे कमी नसतो, गळ्याला आल्यावर सगळेच करतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीआधीच जावळीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. हुमगावच्या हाणामारीनंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या या पलटवारामुळे जावळीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.