NCP Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात गटाची बांधणीस सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार गटातील वैभव पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का मानला जात आहे.
अजित पवार गटाकडून सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांच्याकडे तर शहर जिल्हाध्यक्षपद प्रा. पद्याकर जगदाळे यांच्या हाती सोपवले. मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा `साहेब की दादा` असा गोंधळ दूर झाल्याने अजित पवार गटातील प्रवेश निश्चित झाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पदाधिकऱ्यांच्या नियुक्तीतून अजित पवार गटाने शहरी व ग्रामीण भागात पाय पसरण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसते आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गट असे विभाजन झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांच्या सोबत कायम आहेत. परंतु पक्षातील फुटीचा परिणाम जिल्ह्यात होवू लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांची जिल्ह्यातील यंत्रणा शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यामार्फत राबविण्यात येते. याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक नाराज होते. मागील काही वर्षे बजाज यांचा वाढत्या हस्तक्षेपाबाबत दबक्या आवाजात चर्चा होती. आता, अजित पवार यांचा स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर जिल्ह्यातील काही मंडळी अजित पवार गटात सहभागी होऊ लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आजही आपल्या पक्षापेक्षा गटाची बांधणी एकसंघ राहील, याची काळजी घेतली आहे. मात्र, आता त्यांच्याबाबतही शंका व्यक्त करण्यात येते.
या परिस्थितीमध्ये अजित पवार गटाकडून सांगली जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करत गट मजबूत करण्यात येतो आहे. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील व त्यांचे पूत्र विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना बळ न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने वैभव पाटील यांनी थेट अजित पवारांची भेट घेऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्ह्याचे कारभारी निश्चित केले आहेत. तीन नव्या शिलेदारांची नियुक्ती झाली आहे.
विट्याचे वैभव पाटील यांना जिल्हाध्यक्ष, प्रा. पद्माकर जगदाळे यांना शहर जिल्हाध्यक्ष, तर मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष केले. तीनही नेत्यांचा राजकीय अभ्यास आहे. मात्र, राजकीय विस्ताराच्या मर्यादा उघड आहेत. अजित पवार गटाची तहान एवढ्याने भागणारी नाही. त्यांना ‘हेवीवेट’ नेते हवे आहेत. त्यांनी नव्या चेहर्यांनाही ऑफर दिली. जतचे माजी आमदार विलासराव जगताप भाजपवर नाराज आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना भाजपने ताकद दिलेली नाही. अमरसिंह देशमुख यांना दिलेले विधानसभा क्षेत्र प्रमुखपदही गोपीचंद पडळकरांनी काढून घेतले. या नेत्यांसाठी अजित पवार गट प्रयत्न करेल, अशी स्थिती आहे.
याशिवाय हिंदकेसरी मारुती माने यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांच्यासह डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यांनी अजून तळ्यात-मळ्यात भूमिका कायम राखली आहे. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी ‘दादा की साहेब’ या गोंधळातून आता बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे दादा गटाला येथे विस्तार करणे, बांधणी करणे आणि महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत प्रभाव दाखवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.