राहुल गडकर :
Kolhapur News: लोकसभेची निवडणूक असो, की विधानसभेची निवडणूक. कोल्हापुरात घडणाऱ्या राजकीय स्टंटबाजीची जिल्ह्यात चर्चा होत असते. कोल्हापुरातील नेत्यांमध्ये राजकीय विरोध टोकाचा पाहायला मिळतो. कोल्हापूर दक्षिण असो किंवा कागल विधानसभा मतदारसंघ येथील राजकीय टोकाचा संघर्ष लपून राहिलेला नाही. मात्र, आता याला छेद देण्याचा प्रयत्न त्याच राज्यकर्त्यांनी दाखवून दिला आहे.
काही जणांनी मताच्या पेटीसाठी तर काहींनी स्वार्थ न पाहता विकासकामाचे कौतुक करणे सुरू केले आहे. समाजाच्या प्रश्नावर खांद्याला खांदा लावून लढणारे हेच लोकप्रतिनिधी कोल्हापूरच्या राजकारणात एक नवीन उदाहरण घालून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर कट्टर वैरी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या समीकरणामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळी नांदी नांदत आहे.
कागल विधानसभा मतदारसंघाला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. विद्यमान आमदार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समरजित घाटगे हे राजकीय विरोधक आहेत. तसेच घाटगे यांचे ठाकरे गटाचे संजय बाबा घाटगे हेदेखील राजकीय विरोधक आहेत.
मुश्रीफ महाविकास आघाडीत असताना त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्यामागे समरजित घाटगे यांचा हात असल्याचं बोललं जातं. तसेच समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांना पराभव करूनच आमदार होईन, अशी शपथ जाहीरपणे घेतली होती, पण राजकारणाला राजकारणापुरतेच मर्यादित ठेवून हे दोन घाटगे आणि मुश्रीफ सुळकुडच्या पाणी योजनेवरून खांद्याला खांदा लावून लढत आहेत.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि भाजपचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनीदेखील इचरकंजीला सुळकुडच्या योजनेतून पाणी देण्याचा विडा उचलला आहे. खासदार माने आणि आमदार आवाडे हे एकेकाळचे राजकीय विरोधक आहेत; पण सुळकुडच्या योजनेवरून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. इचलकरंजीच्या प्रश्नांवर हे दोघे एकत्र लढत असल्याचे चित्र संध्या दिसून येत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून भोपळ्यासारखे वैर असलेले खासदार धनंजय महाडिक यांनीदेखील सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. यांचे कट्टर वैरी आमदार सतेज पाटील यांचे थेट पाइपलाइनवरून कौतुक केलेले आहे. याशिवाय ज्यांच्या कामाचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही धनंजय महाडिक यांनी यापूर्वी दिलेली आहे. एकूणच पाहिले तर प्रत्येक घटनेवरून एकमेकांवर आग ओकणारे अलीकडे मात्र सहकार्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
2019 च्या निवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे पराभव झाल्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पराभवाचे खापर फोडले होते, पण शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यानंतर या दोघांमध्ये आपुलकीचा जिव्हाळा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील हे क्षीरसागर यांच्या घरी जाऊन जवळपास अर्धा तास चर्चा करत बसले होते.
विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना आपले हेवे दावे दोघांनीही बाजूला ठेवून सकारात्मक दर्शन घडवले होते. एकूणच पाहिले तर कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे तोंडही न पाहणारे नेते नव्या पिढीला विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र लढण्याचा धडा देत असल्याचे दाखवून देत आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.