
पुणे : "साखरेची किमान विक्री किंमत अर्थात एमएसपी अनेक वर्षांपासून वाढवलेली नाही. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे शॉर्ट मार्जिन लक्षणीय वाढले आहे. आमची ही अडचण केंद्र सरकारसमोर मांडून आम्ही थकलो आहोत. आता तुम्हीच आमचे नेतृत्व करा," असं साकडं पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य साखर कारखानदार नेत्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना घातलं आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले, की एफआरपी यापूर्वी पाच वेळा वाढवली. परंतु साखरेची ‘एमएमपी’ केवळ दोन वेळा वाढवली. यातून साखरेचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. खर्च भरमसाट आणि नफा कमी होताच आर्थिक व्यवस्थापनात अपुरा दुरावा तयार होतो.
यातून केवळ साखर निर्मितीवर अवलंबून असणारे कारखाने शॉर्ट मार्जिनच्या चक्रात वेगाने गुरफटत आहेत. त्यामुळे ‘एमएसपी’ न वाढविल्यास काही कारखाने भविष्यात कायमचे बंद पडतील. ही समस्या आम्ही अलीकडेच मंत्री गडकरी यांच्या कानावर टाकली आहे. त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
दुसऱ्या बाजूला ‘शॉर्ट मार्जिन’मुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांचे नियोजन विस्कळित होत आहेत. साखरेची किंमत वाढविल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली. परंतु त्याप्रमाणात ऊसाची उपलब्धता होत नाही. परिणामी, कारखान्यांचे गाळप दिवस दीडशे दिवसांवरून घटून तीन महिन्यांच्याही खाली आले आहेत.
त्याचवेळी कमी दरात साखर विक्रीचे बंधन कायम आहे. त्यामुळे शॉर्ट मार्जिन वाढत आहे, अशी चिंता वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केली.
एमएसपी वाढीच्या मागणीसाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने केंद्रीय सहकार मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. एफआरपी वाढविल्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च आता प्रतिकिलो 41.66 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यातून साखर कारखाने मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. केंद्राने तातडीने साखरेची किमान विक्री किंमत तसेच इथेनॉलचे खरेदी दर वाढविण्यासाठी पावले टाकावीत, अशी आग्रही मागणी या पत्रात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.