Sangola News : मागील पन्नास वर्षाच्या कार्यकाळात एक हाती सत्ता देऊन स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांनी जो निर्णय घेतला त्याला आजवर तालुक्याने सन्मान दिला. आता त्यांचे नातू निर्णय घ्यायला लागले ते तालुक्याने मान्य करायचे का? ही घराणेशाहीची परंपरा मोडून काढत बाजार समितीचा पारदर्शी कारभार करुन बळीराजाला न्याय मिळवून देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. आता जिंकण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरावे. विजय निश्चित आपलाच असेल, असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची सोमवारी (ता.२७) बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, "शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसह त्यांना लागणाऱ्या सर्व सुखसोयी निर्माण करून देण्यात येतील. त्यासाठीच सुरक्षित बाजार समितीचे स्वप्न साकार करणे गरजेचे आहे, म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक जिंकायची आहे. भविष्यात सांगोला (Sangola) कृषी उत्पन्न समिती ही एक आदर्शवत संस्था बनेल, यासाठी कायम पाठीशी असणार आहे."
माजी आमदार दीपक साळुंखे पाटील (Deepak Salunkhe Patil) म्हणाले, "स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आम्हा सर्वांना सहानुभूती होती. त्यामुळे सूतगिरणी, सोसायटी, खरेदी-विक्री संघ या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या विनंतीला मान दिला, परंतु याचा अर्थ त्यांनी वेगळा काढत गावगाड्यांच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांकडून त्याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भावनांचा आदर करून कार्यकर्त्यांना जे पाहिजे तेच राजकारणात घडेल. राज्यात एक आदर्शवादी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू."
यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, भाजपाचे नेते संभाजी आलदर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यकर्त्यांनीही आपली मतं व्यक्त केली. या विचार विनिमय बैठकीसाठी सांगोला तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन-संचालक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.