Kolhapur News : राज्यभरातील मराठा समाज आरक्षणसाठी आक्रमक झाला आहे. कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसेच मोदी यांना राज्य सरकारने विषय समजावून सांगितला पाहिजे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हा विषय सुटणार नाही, असे मत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात मराठा आरक्षणचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मागण्यांवर ठाम आहेत. त्यावर आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाचा प्रश्न राज्यापेक्षा दिल्लीत सोडवला पाहिजे. केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. यामुळे हा प्रश्न सुटू शकतो.
हा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारच सोडवू शकते, असेही ते म्हणाले. केंद्रात त्यांच्याकडे बहुमत आहे. घटनादुरुस्ती करून 50 टक्केची मर्यादा वाढवल्यास ओबीसीतुून आरक्षण वैगरे हे वाद राहणार नाहीत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने यापूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा जीव वाचवणे सरकारला अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी तो वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नसल्याने आंदोलकांवर लाठीमार झाला आणि त्यामुळेच विषय चिघळला, असेही श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी सांगितले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.