

Mangalvedha, 09 October : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवेढ्यात भाकरी फिरवली आहे. पाणी आंदोलनातील पांडुरंग चौगुले यांच्याकडे मंगळवेढा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी सोपवली आहे. चौगुले यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
‘ज्येष्ठ नेते शरद पवार बोले आणि मंगळवेढा (Mangalvedha ) हाले’ अशी मंगळवेढा तालुक्याची परिस्थिती होती; परंतु 2009 च्या विधानसभा निवडणुकीत हा बुरुज ढासळला. त्यानंतर तब्बल दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला आमदार निवडून आणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भारत भालके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा आमदार मिळाला; परंतु भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा ताब्यात ठेवता आली नाही.
गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) आणि काँग्रेस पक्षात योग्य समन्वय न झाल्यामुळे राज्यात पंढरपूरच्या जागेवर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिला. त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसला, अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी बदलाचे संकेत होते. पण, त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होत नव्हते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सोडतीनंतर नगरपालिका नगराध्यक्षांसह प्रभाग रचनाही निश्चित झाली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या गटांची (मतदारसंघ) आरक्षण सोडत निघणार आहे, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवत यापूर्वीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांच्या जागी आंदोलनातील धडाडती तोफ पांडुरंग चौगुले यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बाजू ते प्रभावीपणे मांडू शकतील. त्याचा फायदा अनिल सावंत यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवल्या जाणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होऊ शकेल. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीपूर्वी 35 गावच्या पाणी आंदोलनात चौगुले यांनी प्रमुख भूमिक बजावली होती.
चौगुले यांच्यासोबत (स्व.) जयसिंग निकम, बसवराज पाटील, राजू पाटील, भागवत भुसे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 22 पैकी दहा गावांतील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे बारा गावांत अल्पसे मतदान झाले होते. चौगुले यांनी दामाजी कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहे. चळवळीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. समविचारी आघाडीच्या वतीने दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर यांच्या हस्ते पांडुरंग चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू : पांडुरंग चौगुले
पाण्यासारख्या प्रश्नावर लढा उभारून 2009 पासून सरकारला पाण्याची तीव्रता दाखवण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला, ती जबाबदारी आपण सार्थ करून दाखवू, असा विश्वास नूतन तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.