

Pandharpur, 18 July : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 25 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला येणार आहेत. त्यावेळी पांडुरंगाने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विठुरायाला घातले.
शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारला आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. प्रसंगी आम्ही रक्त सांडू; पण जमीन देणार नाही, असा थेट इशाराही राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी 12 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील, रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
इसबावी येथील एका मंगल कार्यालयामध्ये आज सकाळी बाधित शेतकऱ्यांचा मेळावा झाला, त्यानंतर इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी भरपावसात या नेतेमंडळींच्या उपस्थितीत सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पायी दिंडीमध्ये सुमारे 2000 शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आमची घरंदारं मोडून तुम्ही विकास करणार असाल तर आम्ही सरकारचं थडगं बांधायला देखील मागेपुढे पाहणार नाही. शक्तीपीठ महामार्ग हा अदानी-अंबानी अशा मोठ्या उद्योगपतींसाठी तयार केला जाणार आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना काडीचाही उपयोग होणार नाही. उलट महामार्गावरून जाणाऱ्यांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी जवळपास अडीच हजार एकर शेती बाधित होणार आहे. या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपुरात येणार आहेत, त्यांनी विठ्ठलाच्या साक्षीने वेदांत जोशी, सुनील जोशी, फी प्रभाकरन हे कोण आहेत, हे वारकऱ्यांना सांगावे, असे खुले आव्हान ही यावेळी शेट्टी यांनी केले.
सरकार शेतकऱ्यांचा विरोध डावलून हा महामार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. जोपर्यंत हा महामार्ग रद्द केला जाणार नाही; तोपर्यंत आमचा लढा सरकार विरोधात असाच सुरू राहील, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिला. या वेळी महादेव जानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील, आमदार अभिजीत पाटील यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.