Solapur, 15 August : माजी आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांच्या गटाने विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परिचारक गटाने मेळावे आणि दौरे करून मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली आहे. त्यातून प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे.
तसेच, परिचारकांच्या अत्यंत विश्वासू पदाधिकाऱ्यांनी बार्शीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे परिचारकांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह तुतारीकडे असला तरी प्रशांत परिचारकांच्या मनात नेमकं काय आहे, याची उत्सुकता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर (Pandharpur) मतदारसंघातील सर्वच नेत्यांकडून तयारी सुरू आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे हे निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक आहेत, त्यामुळे भाजपच्या तिकिटासाठी आवताडे यांच्याबरोबरच प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही स्पर्धेत आहेत. पंढरपूरमध्ये महायुतीकडे अनेक प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत.
प्रशांत परिचारक गटाने गेल्या महिन्यांत पंढरपूर मतदारसंघातून मेळावे घेत राजकीय चाचपणी केली आहे. त्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी प्रशांत परिचारक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही वाच्यता केलेली नाही.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या आठवड्यात बार्शीच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी प्रशांत परिचारक यांच्या कट्टर समर्थकांनी बार्शीत जाऊन पवारांची भेट घेतली आहे. परिचारक यांच्याकडून उमेदवारीसंदर्भात चाचपणी सुरू आहे की काय, अशीही चर्चा त्या भेटीनंतर होत आहे.
एकंदरीतच पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून परिचारक यांनी तुतारीवर निवडणूक लढवावी, असा आग्रह असला तरी परिचारक यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबाबतचा अंदाज त्यांनी अजूनही कोणाला लागू दिला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून परिचारक तुतारी हाती घेणार की भाजपकडून न्याय मिळेल, या प्रतीक्षेत राहणार याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.