Sangola News : भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आज (ता. ७ सप्टेंबर) सांगोल्यात जाऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी गणपतआबांच्या पत्नी रतनकाकी आणि नातू बाबासाहेब देशमुख यांची आपुलकीने चौकशी केली. आबासाहेब कधीही बोल्ड न झालेले खेळाडू राहिले आहेत. माझ्या आजारपणामुळे आबासाहेबांच्या निधनानंतर मी येऊ शकले नव्हते, त्यामुळे देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज आले होते. (Pankaja Munde meet the family of Ganpatrao Deshmukh)
भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा करीत आहेत. त्यांचे ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे. पंकजा मुंडे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. सकाळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर सांगलीत येऊन गणपतीचे दर्शन घेतले.
सांगलीहून त्या सांगोलामार्गे पंढरपूरला येत होत्या. पंढरपूरला येत असताना त्यांनी सांगोल्यात माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरी भेट दिली. या वेळी गणपतआबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. पंकजा मुंडे यांनी गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनकाकी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, गणपतराव देशमुख हे सर्वपक्षातील सर्वमान्य नेतृत्व होते. त्यामुळे अनेकजण त्यांच्या सल्ल्यासाठी सांगोल्यात येत असतात. राजकीय प्रतिस्पर्धीही गणपतराव देशमुख यांच्यासोबत येऊन गप्पा मारत असत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही सर्वपक्षीय नेतेमंडळींचा राबता गणपतआबांच्या निवासस्थानी कायम असतो.
मराठा आरक्षणाविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कधीही शब्द न बदलणारी गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. मी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ठाम असून मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. सर्वांना एकत्रित येऊन, कायदे तज्ज्ञांना घेऊन न्यायालयात टिकणारे आरक्षण निश्चितपणे मिळाले पाहिजे. मी प्रदीर्घ काळ विश्रांती घेतली नसून महाराष्ट्रात माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. मी आमदार, खासदार नसल्याने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी हा दौरा करत आहे.
मागील पंधरा दिवसांत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आजारी असतानाही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्याच प्रमाणे शिवशक्ती परिक्रमा करणाऱ्या पंकजा यांनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.