Phaltan Politics : राजकीय घडामोडी आणि परंपरागत विरोधकांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या फलटण तालुक्यातील निंबाळकर घराण्याला जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणानुसार, निंबाळकर घराण्याला नेत्यांना आपले गट सोडून शेजारच्या गटांमध्ये राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा लागणार आहे.
फलटण तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राजे गट व खासदार गट या दोन प्रमुख गटात लढवल्या जाणार आहेत. यावेळी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ गट आहेत. यामधून आगामी निवडणुकीसाठी चार गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन गट राखीव आहेत. केवळ दोन गट सर्वसाधारण खुले राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या आठ गणांपैकी चार महिला सदस्य निवडून जाणार आहेत. या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांचे पत्ते कट झाले आहेत. यात काहींना आपला गट बदलावा लागणार आहे, तर काहींना आपल्या पत्नींना उभे करावे लागणार आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, जिजामाला नाईक-निंबाळकर यांचे पारंपरिक गट राखीव झाल्याने त्यांना दुसऱ्या गटातून नशीब आजमावे लागणार आहे. यामुळे फलटणच्या राजकीय रणांगणामध्ये पक्षीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पंचायत समितीचे एकूण १६ सदस्य निवडले जाणार असून, सभापतिपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाले आहे. यामध्ये आठ महिला सदस्य निवडून येणार आहेत. यातील साखरवाडी (पिंपळवाडी) व सांगवी गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणाहून निवडून येणाऱ्या महिला सभापतिपदाच्या दावेदार असणार आहेत. यामुळे या दोन गणावरती सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
नाईक निंबाळकर घराणे जिल्हा परिषदेत दिसणार नाही?
फलटण विधानसभा मतदारसंघात नाईक-निंबाळकर घराण्याचा दबदबा आहे. 1995 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर इथून अपक्ष आमदार झाले. 1999 आणि 2004 मध्येही ते इथून विजयी झाले. पण 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत एससी प्रवर्गाचे आरक्षण पडले आणि फलटण राखीव झाले. त्यामुळे रामराजेंना विधान परिषदेचा आधार घ्यावा लागला. आता हक्काच्या जिल्हा परिषद गटांवरही एससी प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने नाईक-निंबाळकर घराण्याची राजकीय कोंडी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.