सातारा : किसन वीर साखर कारखान्याचा भाग असणारा खंडाळा सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया बँकेने जाहीर केली आहे. हा कारखाना लिलावात निघाल्यास 'किसन वीर' सह शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आमचे प्रस्ताव नाकारल्याने खंडाळा कारखान्यावर ही वेळ आली आहे. लिलावातून हा कारखाना कोणाच्या तरी खासगी व्यक्तीच्या हातात देण्याचा त्यांचा डाव असल्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खंडाळा कारखाना कसा वाचवणार हे जाहीर करावे, अशी मागणी 'किसन वीर'चे माजी अध्यक्ष मदन भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
मदन भोसले म्हणाले, निवडणूकीनंतर खंडाळा कारखाना सुरु करण्याचे आवाहन आम्ही परिवर्तन पॅनेलच्या आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील यांना केले होते. यासाठी आम्ही त्यासाठीचा करार आठ दिवसांत उलटवून देणार होतो असे सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारखाना पूर्णपणे बंद राहिला. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आता हा कारखाना लिलावात निघत आहे. या कारखान्याच्या उभारणीत 'किसन वीर'चे भांडवल गुंतले आहे. हा कारखाना लिलावात निघाल्यानंतर त्याचा फटका 'किसन वीर'ला बसणार आहे. निवडणूकीच्या काळात आम्ही सहकारी साखर कारखानदारी खासगी होवू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. ही भीती आता आम्हाला खरी होत असल्याचे जाणवत आहे.
खंडाळा कारखाना लिलावातून खासगी हातात सोपविण्याचा डाव तर नाही ना, असा प्रश्न आमच्यासह शेतकऱ्यांना पडला आहे. खंडाळा वाचविण्याची कुवत आमदार पाटील, नितीन पाटील यांच्यात नाही. शेतकऱ्यांसाठी आमदार पाटील, नितीन पाटील यांनी खंडाळा कारखाना कसा वाचविणार हे जाहीर करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अजूनही शेतकऱ्यांना देणी, कामगारांचे पूर्ण पगार केले नाहीत.
तत्कालिन सरकारचा फायदा घेत त्यांनी माझी प्रत्येक पातळीवर कोंडी केली. ही कोंडी फोडत आम्ही कारखाना अंतिम टप्प्यात सुरु केला. मात्र, निवडून आल्यानंतर चार दिवसांत सत्ताधाऱ्यांनी कारखाना बंद करत असल्याचे पत्र आयुक्तांना दिले. सत्तापालटानंतर चार महिन्यात सहकाराचे चित्र बिघडल्याचा आरोपही मदन भोसले यांनी यावेळी केला.
संस्थांच्या गळ्यांना नख ...
'किसन वीर'च्या छत्रछायेखाली खंडाळा आणि प्रतापगड कारखाने सुरु होते. काही धोरणांमुळे नंतर त्यात अडचणी आल्या. यानंतरच्या निवडणूकीतील कौल आम्ही मान्य केला. सध्या 'किसन वीर'चे व्यवस्थापन आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आहे. एकही संस्था न उभारलेले, खंडाळ्या सारख्या सहकारी संस्थांच्या गळ्यांना नख लावू शकतात. एवढा निधी आणतो, जिल्हा बँकेकडून इतके कर्ज मिळवणार अशा घोषणा करणाऱ्यांना जिल्हा बँकेने एक रुपयाही न दिल्याची माहिती मिळत असल्याचेही श्री. भोसले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.